Thursday 12 March 2020

शिक्षणात समाजाचे प्रतिबिंब पडायला हवे.

टॉमस हक्सली म्हणतात "सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण" तर जेम्स ड्यूइ, पिअर्स या तत्त्ववेत्त्याच्या मते " शिक्षण म्हणजे भोवतालच्या नैसर्गिक वातावरणाशी व सामाजिक वातावरणाशी समरस होण्याची पात्रता मुलांच्या अंगी आणून देणे. " तर प्लेटो अॅरिस्टॉटलच्या मते "आदर्श नागरिक तयार करणे." अशा अनेकविध शिक्षणाच्या व्याख्या अनेक शिक्षणतज्ञ, विचारवंतांनी आजतागायत केलेल्या आहेत. 

'शिक्षण' या संकल्पनेचा उदय प्रागैतिहासिक काळात झाला. बाळ जन्माला आल्यानंतर त्याची पहिली गुरू त्याची आई त्याला शिक्षण देत असते. आई, वडील आणि मग आजूबाजूचे नातेवाईक ह्या शिक्षण देणाऱ्या संस्था असतात. थोड्या कालावधीत ते मूल शाळेत जाऊ लागतं आणि शाळेत खऱ्या अर्थाने त्याला चाकोरी बद्ध शिक्षण देण्यास प्रारंभ होतो. शिक्षणाने विद्यार्थी घडतो आणि त्याचे रूपांतर एका सुजाण नागरिकात होत असते आणि म्हणूनच शिक्षणामध्ये समाजाचे प्रतिबिंब दिसून यायला हवं. 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संपूर्ण जबाबदार ठरते. जसे शिक्षण देऊ तसा समाज घडतो. ब्रिटिश भारतात आले आणि लॉर्ड मकॉले यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांचे शिक्षणाच्या  देण्याचे ध्येय केवळ 'कारकून' तयार करणे हे होते. कारण त्यांना भारतात राज्य करायचे होते. राज्य करायचे असेल तर त्यांची व्यवस्था पुढे नेणारे शिक्षित लोक त्यांना हवे होते. त्या पद्धतीच्या शिक्षणाने त्यांनी पुढील दीडशे वर्ष राज्य केले. म्हणजेच दिलेले शिक्षणच ठरवते की समाज कसा घडेल ? 

सुजाण, जबाबदार, प्रगत, सुसंस्कृत समाज घडण्यास सकस शिक्षण देणं आवश्यक असते. त्याप्रमाणेच अभ्यासक्रम तयार करायला हवा. अभ्यासक्रम ही शिक्षणाची "निव की इट" म्हणजेच पाया असतो. म्हणून विद्यार्थ्यांच्या हाती जो अभ्यासक्रम सोपवला जातो तो तज्ज्ञ, निष्णात व्यक्तीकडून तयार केला गेला पाहिजे. शिक्षणाची उद्दिष्टे समाज व देश हिताची असायला हवीत. 

इतर देशांच्या तुलनेत आपली भारतीय पिढी किंवा कुमार, युवा, तरुण वर्ग हा शास्त्रीय दृष्ट्या पिढीगणिक बुद्यांक वाढवणारी आहे. साहजिकच त्यांना तसे खाद्य पुरवणारी व बुद्धी विकसित करणारी शिक्षण व्यवस्था असली पाहिजे तरच देशाला प्रगतीपथावर नेता येईल. जे जे म्हणून शिक्षणातून पेरले जाईल तेच पिढी घडवेल त्यातून देश आकार घेईल.

विद्यार्थ्यांमध्ये उपजत व अंगीभूत गुण किंवा जीन्स आणि घर व परिसरातील संस्कार तर महत्त्वाचे आहेतच पण सर्वात महत्त्वा चे ठरते ते शिक्षण!! अशा या समाज निर्मितीक्षम शिक्षणाची आज दुरावस्था झाली आहे. समाजाचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात हवे. विद्यार्थी अभ्यासत असलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपला वाटायला हवा. भारतातील सर्व पुरोगामी संस्क्रृती व चालीरितींचे उहापोह अभ्यासक्रमात व्हायला हवा. खरा इतिहास विद्यार्थ्यान समोर यायला हवा. अभ्यासक्रम तयार करणारी मंडळी त्याविषयातील तज्ञ हवीत. भाषाशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ , मानसोपचारतज्ज्ञ, गणितातील व विज्ञानातील तज्ञ व्यक्तींची नेमणूक अभ्यास मंडळावर व्हायला हवी.  सरकार बदलले की अभ्यासक्रम व शिक्षण व्यवस्था बदलण्याचा घाट प्रत्येक सरकार करत असते. कित्येक शाळा शिक्षणासंदर्भात वेगवेगळे निर्णय घेत असतात. कितीतरी शाळा मनमानी पद्धतीने शाळेतून आपला धार्मिक अजेंडा पुढे नेण्याचे काम करतात. वैद्यानिक दृष्टिकोन जोपासण्याऐवजी अंधश्रद्धा व धार्मिक चालीरीती वाढवल्या जातात. त्यांना रोखण्यासाठी सक्षम व्यवस्था नाही.  शाळेतच मुलांच्या मनात विष पेरण्याची व्यवस्था निर्माण होते. शिवाय वारंवार पाठ्यपुस्तके बदलल्यामुळे  दरवर्षी विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम व नवनवीन फॉर्मॅट्स ना तोंड द्यावे लागते . शिक्षण हे "विद्यार्थी केंद्री" असायला हवे. शिक्षण दर्जदार व सकसही असायला हवं. केंद्राच्या धर्तीवरचा राज्याचा आपला दर्जेदार अभ्यासक्रम हवा. विद्यार्थ्याला विषय सोपा जायला हवा, पण विषयाचे एवढाच आपल्या शिक्षणाचा उद्देश आहे का?  ही बाब लक्षात न घेतल्याने गुणवत्ता आणि ज्ञान यांचा निव्वळ बोजवारा उडालेला बघायला मिळतो. 

आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोर्डांच्या शाळा उघडल्या जात आहेत. राज्यसरकारनेच आंतरराष्ट्रीय शाळा नावाचे दुसरे बोर्ड सुरु केले होते. खूप टीका झाल्यामुळे आता ते बोर्ड बंद केले आहे. एकच बोर्ड होते तेव्हा सर्व माध्यमांची मुलांना समान प्रकारचे शिक्षण मिळत होते. वेगवेगळे बोर्ड निर्माण झाल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये वेगळेपणाची भावना निर्माण होते. जर एकसंघ समाज तयार करायचा असेल असेल तर सर्वांना समान व दर्जेदार शिक्षण द्यायला हवं. विषयाचं व भाषेचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना द्यायलाच हवं. विद्यार्थ्याला मातृभाषेतून शिक्षण द्यायला हवं. तरच विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतो. तो या शिक्षण व्यवस्थेची तात्काळ जोडला जातो. अनेक प्रकारचे बोर्ड्स वाढती सुबत्ता आणि आर्थिक समृद्धी यामुळे जणू पालकांमध्येही शाळा निवडीसाठी चुरस निर्माण झाली आहे. पालकांच्या स्टेटसप्रमाणे व आर्थिक कुवतीप्रमाणे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची बोर्ड्स निवडली आहेत. आपल्या मुलाचा जर उद्धार करायचा असेल तर त्यांला महाग बोर्डाच्या शाळेत घालायला हवं. अशी पालकांची धारणा निर्माण झाली आहे. मातृभाषेत न शिकणा-या विद्यार्थ्यांना स्वतःची भाषाही निट लिहिता- बोलता येत नाही. "इंग्रजी" बोलता तर येते पण माहिती आणि ज्ञानापासून ही पिढी वंचित राहत आहे. अशा "संमिश्र" शिक्षण व्यवस्थेमुळे समाजही विचित्र पद्धतीने संमिश्र बनेल. सहाजिकच या बलशाली पिढीला ना भाषेबद्दल अभिमान ना देशाबद्दल म्हणूनच संकुचिततेकडे आणि स्वयंकेंद्रिततेकडे ही पिढी वळते आहे. ही धोक्याची घंटा आहे "शिक्षण" हेच समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज बदलताना दिसतो म्हणून शिक्षणात  समाजाचे प्रतिबिंब पडणे गरजेचं आहे. सर्वंकष, एकसंध, सर्वसमावेशक असा सर्व बोर्डांसाठी एकच अभ्यासक्रम तयार केल्यास समाजाची प्रगती होईल. जागतिकीकरणामुळे नवनवीन संकल्पना रोज समोर येत आहे. या संकल्पना अभ्यासक्रमात यायला हव्यात. अभ्यासक्रम हा येथील मातीतील समाजाशी जोडला जायला हवा. शिक्षणात जर येथील समाजाचे प्रतिबिंब पडत नसेल तर निराशेच्या गर्तेत समाज गेल्या विना राहणार नाही हे निश्चित!!! 

जालिंदर  देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य.
अध्यक्ष-मुंबई ग्रॅज्युएट फोरम.