Saturday 28 December 2019

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व

आपल्या भारतीय संस्कृतीत "माता, मातृभूमी आणि  मातृभाषेचं" महत्त्व एकमेवद्वितियच! मेकॉले यांनी सर्वप्रथम भारतात १८३५ साली इंग्रजी भाषेचा वापर सुरू केला. त्यानंतर भारतातील मातृभाषांची  इंग्रजीसोबतची लढाई सुरु झाली. इंग्रजी भाषेने भारतभर धुमाकूळ घातलेला आहे. आज इंग्रजी ही व्यवहाराची भाषा झालेली आहे. परंतू इंग्रजी भाषेत शिकलेली भारतीय मुले आज खरंच शास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत बनत आहेत का? हा यक्षप्रश्न आपणा सर्वांसमोर आहे. बालकांचे शिक्षण मातृभाषेतच व्हावे हा अट्टाहास का धरला जातो आहे याची कारणे पाहू या. 

मातृभाषा हिच शिक्षणासाठी सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ यांच्यात याबाबत दूमत नाही. विद्यार्थी जर मातृभाषेतून शिकला तरच त्याचा बौद्धिक विकास होतो. बौद्धिक विकासात भाषेची भूमिका फार महत्त्वाची आहे. विद्यार्थी जितके जास्त प्रश्न विचारतो तितके त्याला जास्त ज्ञान प्राप्त होतं. जितकं जास्त ज्ञान प्राप्त होते तितका विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होत असतो. मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त करणारेच शिक्षणाचे माध्यम असावे. विद्यार्थ्यांना मातृभाषेवर लवकरच प्रभूत्व मिळवता येतं. विद्यार्थ्यांची भाषाक्षमता त्याच्या मातृभाषेतूनच वाढते. विद्यार्थी घरातच तिसऱ्या, चौथ्या वर्षीच प्रश्न विचारायला सुरुवात करतो. पुढे आठ ते नऊ वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना प्रचंड प्रश्न पडलेले असतात. या प्रश्नांच्या उत्तरातूनच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधला जातो. 

मुलांची जिज्ञासा, कुतूहल फार महत्त्वाचं असतं. मुलाच्या जन्मापासून ते वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत हे जास्तीचं कुतूहल फार महत्त्वाचं असतं. या वयातच विद्यार्थी जास्त प्रश्न विचार असतात. परंतू हेच विद्यार्थी जर दुसऱ्या माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेत असतील तर खरी समस्या इथूनच सुरू होते. या वयात इंग्रजी वा तत्सम इतर भाषेची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये शून्य असते. अशा वेळी विद्यार्थी फक्त भाषा शिकायचा प्रयत्न करतो. भाषाक्षमता नसल्यामुळे त्यांचे प्रश्न विचारणे बंद होते. प्रश्न विचारण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी त्याला किमान पाच वर्षे लागतात. प्रश्न विचारण्याची क्षमता जोपर्यंत विद्यार्थ्याला येते तोपर्यंत त्याची जिज्ञासा संपलेली असते. त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवं तरच त्यांचं बौद्धिक विकास व कुतुहूल शाबूत राहील. 

युनेस्को ही जागतिकस्तरावरची संस्था, मातृभाषेतील शिक्षणासाठी आग्रही आहे. १९९० च्या दशकापासून युनोस्कोने या संबंधी अनेक लेख, अनेक पेपर, संशोधने प्रसिद्ध केले आहेत. बहुभाषिक देशांनी मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे यासाठी सतत आवाहन करत आहे. जगातील ४०% टक्के मुलं ही त्यांना समजत नसलेल्या भाषेत प्राथमिक शिक्षण घेत आहेत. भारतातही यापेक्षा वेगळी परिस्थती नाही. एकटया महाराष्ट्रामध्ये ९२ बोलीभाषा आहेत. त्यातील  ५० बोलीभाषा या मराठी प्रवाहाशी  जुळलेल्या आहेत. आपण केवळ इंग्रजी भाषेचाच विचार करतो. परंतु  महाराष्ट्रातही अशी परिस्थिती आहे की काही विद्यार्थ्यांना मराठी भाषा सुद्धा इंग्रजी इतकीच परकी आहे. आपला देश, राज्य हे बहुभाषिक आहे. इंग्लंड, जर्मनी, जपान, चीन यांसारख्या देशांनी मातृभाषेला महत्त्व दिलेले आहे. 

जपान हा दुसरी जागतिक अर्थसत्ता असलेला देश. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानवर अणुहल्ला केला आणि हा देश उद्ध्वस्त झाला. जपानने आपली मातृभाषा कायम ठेवत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आर्थिक क्षेत्रात भरारी मारली. जपानी तंत्रज्ञान तर संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम मानले जाते. आपण सर्वजण जपानी तंत्रज्ञानाची उपकरणे गौरवाने आपल्या घरात आणत असतो. या जपान देशाने सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. जपानने मातृभाषेतूनच आपला विकास साधलेला आहे. असं असताना आपण आपल्या बहुभाषिक देशामध्ये मातृभाषेचा आग्रह कायम ठेवायला हवा. 

एक देश, एक भाषा किंवा एक राज्य, एक भाषा हा विचार भारताच्या विविधतेला, एकात्मतेला मारक आहे. आपला अभ्यासक्रमही राज्याचा एकच असतो. याबाबतही आपणाला पुनर्विचार करायला हवा. किमान जिल्हा पातळीवरील भाषेचा अभ्यासक्रम आपणाला राबवता येईल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेतून शिकता येईल का ? विद्यार्थ्यांची बोलीभाषा जाणणारा अथवा विद्यार्थ्यांची मातृभाषा जाणणारा अध्यापक वर्ग उपलब्ध होईल का? आज आदिवासी पाड्यावर, दुर्गम भागात विद्यार्थ्यांची बोलीभाषा जाणणारा शिक्षक उपलब्ध होत नसल्यामुळे शिक्षण नावाची प्रक्रिया शाळेत घडत नाही. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवला जाणारा अभ्यास आपलासा वाटत नाही. तो शाळेपासून दूर जातोय. परिणामी शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त आहे. मुले शाळेत आली तरी शाळेत टिकत नाहीत. शिक्षकांवरही फार मोठी जबाबदारी येऊन पडते. विद्यार्थ्यांची भाषा आणि पुस्तकातील भाषा यांचा मेळ साधताना तारेवरची कसरत पार पाडावी लागते. याही परिस्थितीत शिक्षक आपले कौशल्य पणाला लावून बोलीभाषेतून विद्यार्थ्यांना प्रमाण भाषेकडे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. 

बोलीभाषेला हजारो वर्षाचा इतिहास असतो. बोलीभाषा खऱ्या अर्थाने संस्कृतीच्या वाहक असते. बोलीभाषेमुळे संस्कृती टिकलेली आहे. आज अनेक भाषाशास्त्रज्ञांच्या मतानुसार बोलीभाषा या जागतिकीकरणामुळे, शहरीकरणामुळे लुप्त होत चाललेल्या आहेत. या भाषांचं संवर्धन करणे हे सरकारचे आद्यकर्तव्य आहे. या भाषेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत शिकू देणं आणि त्यांचा बौद्धिक विकास व कुतूहल शाबूत ठेवणं अत्यंत गरजेचच आहे. अन्यथा ही मुलं भावविश्व शून्य, नैराश्यग्रस्त होतील. त्यासाठी सरकारने स्वतः प्रयत्न करणे गरजेचं आहे. 

आज सरकारही इंग्रजी भाषेचा पुरस्कार करताना दिसत आहेत. बीएमसी सारख्या महानगरपालिकेचा कारभार अद्यापही इंग्रजीत चालतो. २० वर्षापासुन  मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळा बीएमसीकडे अनुदान मागत आहेत. बीएमसी त्याकडे ढुंकून पहायला तयार नाही  किमान महाराष्ट्र सरकारने मराठीचा पुरस्कार करायला हवा. न्यायालयापासून तर सर्व सरकारी कार्यालयात केवळ मराठीतच पत्रव्यवहार व्हायला हवा. इंग्रजी किंवा अन्य भाषा या केवळ  इयत्ता  पाचवीनंतर शिकविण्यात याव्यात. इंग्रजी भाषा बोलणं महत्त्वाचं की इंग्रजीतून शिक्षण घेणं महत्त्वाचं याचा विचार आपण करायला हवा. उच्च शिक्षण सुद्धा मातृभाषेतूनच असायला हवं. राज्य सरकारच्या अखत्यारीतील व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील परीक्षांना मातृभाषेतून प्रश्नपत्रिका व उत्तर लिहण्याचा अधिकार हवा विद्यार्थांना हवा. 

जो पर्यंत विद्यार्थी मातृभाषेतून शिक्षण घेत नाही तोपर्यंत चांगले विचारवंत, चांगले शास्त्रज्ञ, दर्जेदार लेखक आपण देशाला देऊ शकत नाही. म्हणून राज्याने पुढाकार घेऊन आपल्या अभ्यासक्रमांचं जास्तीत जास्त विकेंद्रीकरण कसे होईल ते पहायला हवे. जिल्हा पातळीवर भाषेचा अभ्यासक्रम कसा तयार करता येईल. तसेच तो अभ्यासक्रम मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी दर्जेदार अध्यापक वर्ग कसा उपलब्ध होईल याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. 

मराठी शाळा टिकविण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथील करावी लागेल. विद्यार्थांला प्रत्येक विषयाला शिक्षक मिळायला हवा. प्रत्येक विषयासाठी त्या विषयातला पदवीधर शिक्षकच शिकविण्यासाठी हवा. कला, क्रीडाचे शिक्षक उपलब्ध करुन द्यायला हवेत. तरच राज्यातील शिक्षणाची परिस्थिती बदलेल. अन्यथा विदयार्थ्यांंची अवस्था "न घरका न घाट का" अशीच  होईल यात शंकाच नाही!

जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य.
अध्यक्ष- मुंबई ग्रॅज्युएट फोरम.

Tuesday 24 December 2019

राजकीय पटलावर शिक्षण क्षेत्राचे महत्व किती?


सध्या देशभरात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाचा व शैक्षणिक दृष्टीकोणाचा  बोलबाला आहे. सरकारी शाळांमध्ये मुलांना शिक्षण देणं लोकांच्या दृष्टीने शंकेचे झालेलं असताना, दिल्लीतील शाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिसायला लागल्या. दिल्लीतील सरकारी शाळेतील शिक्षकांना परदेशात पाठवून त्यांना प्रशिक्षित करण्यात आलं. सरकारी शाळांमध्ये आलेली मरगळ झटकून टाकण्यात आली. तेव्हा देशातील सरकारी शाळा बदलू शकतात हा विश्वास देशभरातील शिक्षणप्रेमी,  शिक्षणतज्ज्ञामध्ये निर्माण झाला.  

खरा प्रश्न आहे की सर्व पक्षांच्या राजकीय अजेंड्यावर शिक्षण या विषयाचा क्रमांक किती? शिक्षणामध्ये गुंतवणूक करावी की न करावी? यामध्ये राजकीय पक्षांमध्ये कितीतरी मतमतांतरे आहेत. शिक्षण हे अनुत्पादक असल्यामुळे त्याच्यामध्ये पैसे टाकायला सरकार तयार नाही असा सरकारी अधिकाऱ्यांचा खाक्या कायम का असतो.  या सर्व प्रश्नांचा उहापोह करणे गरजेचे ठरेल. 

आज देशभरात शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड जागरूकता निर्माण झालेली आहे. गरिबांपासून ते बहुजनांपर्यंत सर्वांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले आहे. या परिस्थितीमध्ये देशाच्या राज्यघटनेनुसार सर्वांना सक्तीचे, मोफत, दर्जेदार शिक्षण मिळायला हवं. यासाठी सरकारने 2009 साली घटनादुरुस्ती करून 'शिक्षणाचा अधिकार' (आरटई) नावाचा नवीन कायदा पास केला. या कायद्यानुसार सर्वांना वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत सक्तीचे मोफत शिक्षण मिळायला हवं. आपल्या राज्यातील परिस्थिती पाहिली असता खरंच सर्वांना सक्तीचे मोफत शिक्षण मिळते का ? याचं उत्तर नाही असंच आहे. 

आज राज्यभरामध्ये आयबी, सीबीएसई, आयसीएसई तसेच अनेक बोर्डांच्या शाळा आलेल्या आहेत. राज्याने स्वतःचं वेगळं असं आंतरराष्ट्रीय मंडळ स्थापन केलेल आहे. राज्यांमध्ये किमान ५ हजार स्वयंअर्थशासीत शाळा चालू करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. राज्यांमध्ये किमान १० हजार विनाअनुदानित शाळा चालू आहेत. मी वर उल्लेख केलेल्या सर्व शाळा या विद्यार्थ्यांकडून भरघोस फी घेऊन चालविण्यात येत आहेत. असं असताना आपण राज्यघटनेनुसार मोफत व सक्तीचं व दर्जेदार शिक्षण मुलांना देतो असं कसं म्हणू शकतो. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावरून फेकून देण्यासाठी वरील वेगवेगळ्या बोर्डाच्या सर्व शाळांना अधिकृतपणे सरकारने जन्माला घातले आहे. हे कल्याणकारी राज्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. राज्यघटनेला हरताळ फासणारी कृत्य राज्य सरकारकडून वारंवार होताहेत. या राज्यातील बहुजन वर्ग शिकू मागत असताना त्यांच्या शिकण्यामध्ये अडथळा आणण्यासाठीच हे प्रयत्न केले जात आहे. ज्यांच्याकडे पैसा त्यालाच शिक्षण ही संकल्पना राबवण्यात राज्य सरकार पुढाकार घेत आहे. हे अत्यंत भयावह आहे. 

सरकार कोणत्याही पक्षाचं असलं तरी त्यांचा आर्थिक अजेंडा हा एकच आहे. एकीकडे वर उल्लेख केलेल्या शाळांचे पेव फुटलेलं असताना. खेडोपाडी वाड्या, वस्त्यांवर कमी पटसंख्येच्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या, खाजगी अनुदानित शाळा सरसकट बंद करण्याचं धोरण सरकारने घेतलेलं आहे. त्यासाठी १००० पटसंख्येच्या शाळा सुरु करण्याचा घाट घातला जातोय.  

देशभरात फक्त महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्येच खाजगी अनुदानित शाळा मोठ्या प्रमाणावर आहेत. आरटीई कायदा करताना केवळ सरकारी शाळांचाच विचार केल्यामुळे राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्था आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.  सरकारने शिक्षक संख्येचे निकष बदलून तीन भाषांसाठी (मराठी, हिंदी, इंग्रजी) केवळ एक शिक्षक. विज्ञान, गणितासाठी एक शिक्षक समाजशास्त्रासाठी एक शिक्षक अशी अत्यंत तुटपुंजी व्यवस्था केली आहे. शाळेतील कला व क्रीडा शिक्षकाला संचमान्यते बाहेर फेकून देण्यात आले आहे. तीन भाषा  शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक. इतर दोन भाषांना तो शिक्षक काय न्याय देणार?  कोणत्याही प्रकारचं वेतनेतर अनुदान वेळेवर मिळत नाही. मिळालेले  वेतनेतर अनुदान इतके तुटपुंजे असते की त्यातून शाळेचे वीज बिलही पूर्ण भागत नाही. अशा परिस्थितीमध्ये खासगी अनुदानित संस्था चालवणे मुश्किल झालेले आहे. साहाजिकच या शाळांनी खाजगी अनुदानित शाळा बंद करून त्या ठिकाणी स्वयंअर्थशासित किंवा इतर बोर्डांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालू करण्याचे धोरण अवलंबिले आहे. हे सर्व प्रकार राज्य सरकारच्या सहकार्याने होत आहे.  अदानी, अंबानी यासारख्या उदयोगपतींच्या उद्योगांना लागणारा स्वस्त मजूर पुरवायचा असेल तर बहुजनांच्या मुलांनी कमीत कमी शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने विद्यार्थी शिकू नयेत असा अजेंडा राबवण्यासाठी सरकारी व अनुदानित शाळा बंद पाडण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. 

देशातील उद्योगपतींनी आधीच एक रिपोर्ट सरकारला दिला होता त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की  वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंतचे शिक्षण सरकारने द्यावं व पुढील शिक्षणाची जबाबदारी  समाजाने घ्यावी. चौदा वर्षावरील वयाच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा भार उचलण्याची सरकारला गरज नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की गरिबांनी, बहुजनांनी, दलितांनी, वंचितांनी केवळ लिहिण्या वाचण्यापुरतं शिक्षण घ्यावे. ते जर जास्त शिकले तर जास्त पगाराच्या नोकऱ्या त्यांना द्याव्या लागतील व आपल्याला स्वस्त मजूर मिळणार नाहीत हे देशातील उद्योगपतींना माहित आहे. त्यामुळे देशातील भांडवलदारांच्या आग्रहास्तव राज्यातील सरकारी व अनुदानित शाळा या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. यासाठी राज्यातील, देशातील सर्व शिक्षणप्रेमींनी एकत्र येणं गरजेचं आहे. 

अमेरिकेमध्ये जर सरकारी शाळांमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांची मुलं शिकत असतील तर भारतामध्ये सुद्धा सर्वांना एकाच पद्धतीचं व सरकारी शाळेतच शिक्षण देण्यात यावं. एकाच सरकारी शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी का प्रवेश घेऊ नये? सर्वांना समान, दर्जेदार, हक्काचं व मोफत शिक्षण का मिळू नये?  वेगवेगळ्या आर्थिक स्तराच्या मुलांना वेगवेगळ्या शाळा का उपलब्ध असाव्यात. 

जर्मनीमध्ये सर्व प्रकारचे शिक्षण मोफत असताना भारतामध्ये ते शिक्षण मोफत का मिळू शकत नाही. कल्याणकारी राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक वाहन व्यवस्था ही मोफतच असायला हवी. आपणाला जर देशाचा, राज्याचा खऱ्या अर्थाने चेहरा बदलायचा असेल. इंदिरा गांधींनी जसे आणीबाणी मध्ये सर्व बँकांचे चौदा बँकांमध्ये राष्ट्रीयकरण केले होते. तसेच केंद्र सरकारने व राज्य सरकारने देशभरातील सर्व खाजगी व इतर बोर्डांच्या शाळांचे सरकारी शाळांमध्ये रूपांतर करावं.  सर्वांना समान, सक्तीचं, मोफत व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे. सर्वांना एकाच दर्जाचा अभ्यासक्रम मिळायला हवा. शिक्षणात समानता हवी. आर्थिक स्तरावर शिक्षणाचे विभाजन देशाला परवडणारे नाही.  सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात याची जनतेला हमी द्यावी. यासाठी मोठी लोकचळवळ उभी करायला हवी.  अन्यथा याचे विपरीत परिणाम देशाला भोगावे लागतील. 

जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह- शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य.  
अध्यक्ष मुंबई ग्रॅजुएट फोरम.

Tuesday 17 December 2019

विद्यार्थी पिढी आजची आणि कालची ....


आजकाल पालक आणि शिक्षकांमध्ये  कालौघात बदललेल्या पिढीबाबत वेगळे उद्गार ऐकू येतात "आमची पिढी अशी नव्हती." मागच्या पिढीतील आणि आत्ताच्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये फरक नक्कीच आहे, असतोच!

एक शिक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षक चळवळी नेता म्हणून मी या गोष्टींकडे बारकाई ने पहातो. आजचा विद्यार्थी हा टेक्नोसेव्ही आहे. तो प्रचंड वेगवान आहे. त्याच्यासोबत धावताना पालकांची व शिक्षकांची प्रचंड दमछाक होते. परिणामी विद्यार्थांना समजून घेताना जर थोडीशी गल्लत झाली तर पाल्य, पालक व शिक्षक यांमध्ये संघर्ष निर्माण होतो. ही दरी लवकर बुजवली नाही तर विद्यार्थी, पालक व शिक्षकांपासून त्याने दुरावू नये म्हणून दोघांमध्ये सामंजस्यात्मक तारतम्य ठेवावे लागते. हया दरीतील अंतर कमी करून त्याचे दुरावलेपण कमी करता येते. तो आपले स्वत:चे असे विश्व शोधू लागतो. ब-या वाईट संगतीच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त वाढते. तो एकलकोंडा होतो किंवा तो कोणालाही जूमानत  नाही. पालक व शिक्षकांचा टारगेट होतो.  अभ्यासात मागे पडतो.  त्याचा पालकांशी संवाद तुटतो. यामागील कारणांचा शोध घेणे पण क्रमप्राप्त होतं.

एक पिढी म्हणजे बारा किंवा पंचविस वर्षांचे अंतर. आज मुले, पालक किंवा शिक्षक यांमध्ये किमान १ ते २ पिढ्यांचे अंतर आहे. साधारणपणे पालक व शिक्षकांची पिढी ही जेंव्हा शालेय शिक्षण घेत होती. तेंव्हा करमणूकीची साधने ही फार कमी असायची. मुलं तेंव्हा मैदानावर खेळताना आढळायची तर मुली घरातील अंगणात खेळताना. त्याकाळी मोबाईल, संगणक, टिव्ही हे सर्व दुरापास्त. अशा वातावरणात मुलांचा पालकांशी संवाद जास्त असायचा. शालेय ज्ञान केवळ शिक्षकच देत असंत. क्लास संस्कृती  फोफावलेली नव्हती. जे क्लास चालायचे  ते कमर्शिअल नव्हते. त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी होती व्यवहार नव्हता.  त्यामुळे शिक्षकांबद्दल विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड आदर होता. मुलांचं भविष्य शिक्षकांच्या हाती सोपवलं जायचं. घरी संभाळण्यासाठी, माया करण्यासाठी आजी, आजोबा नावाचे मित्रं असत नव्हे तर ते एक सुरक्षा कवच असे. त्यामुळे शिक्षक व पालकांच्या काळातील शैक्षणिक वातावरण फार वेगळे व आपुलकीचे होते. विद्यार्थांच्या शिकण्याचे माध्यम मातृभाषा होती. संदर्भ साधनं मोजकीच होती. अभ्यासक्रम मर्यादित होता. अशैक्षणिक कामांचा दबाव नव्हता. सरकारी शाळा हाच शिक्षणासाठी पर्याय होता. विनानुदानित, कायमविनानुदानित, इतर बोर्डांच्या शाळांचे पेव नव्हते. जीवघेणी स्पर्धा नव्हती. शाळांमध्ये, घरांमध्ये आनंददायी वातावरण असायचं. अशा वातावरणात शिकून मोठे झालेले शिक्षक, पालक आपल्या भावविश्वाचे दाखले मुलांना देतात.  आणि घरात, शाळेत कुरबुरी सुरु होतात.

आजच्या विद्यार्थांचा विचार केला तर शिक्षणात स्पर्धा (रॅट रेस) प्रचंड वाढलेली आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत मुलांचे भावविश्व लोपत चालले आहे. अनेक बोर्ड त्यांचे वेगवेगळे अभ्यासक्रम राबवले जात आहे. शिवाय इंग्रजी भाषा व्यवहाराची भाषा झाल्यामुळे मातृभाषेऐवजी इंग्रजीचा  अट्टाहास धरला जात आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी यामध्ये संवाद कमी होत चालला आहे. शहरीकरण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. सोशल मिडिया आपल्या घरात, हातात आलेला आहे. टिव्ही, संगणक, मोबाइल, ईंटरनेट यांनी पालक, शिक्षक व मुलांना गुरफटुुन टाकलेलं आहे.  माहिताचा प्रचंड स्त्रोत एका क्लिकवर उपलब्ध आहे. आज पालकांनी वेग,राहणीमान व आराम या त्रयीला आपलं साध्य मानलेलं आहे. पालकांना मुलांसाठी वेळंच नाही. आई, वडिल दोघेही नोकरदार आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात आजोबा, आजी रहात नाहीत. अनियंत्रित लोकसंख्या वाढ या सर्व सुबत्तेला गिळंकृत करत असल्याने स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण आपल्या पाल्याला मिळावे अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. पालकांनाही घरात महागड्या वस्तू, आपलं पॉश राहणीमान, सम्रृद्ध बॅंकबॅलन्स, ट्रॅव्हल्स या सर्व बाबी हव्या असतात. परिणामी आपल्या स्टेटसला साजेशी शाळा शोधली जाते. त्यासाठी लाखो रुपये फी मोजली जाते.  बदलता अभ्यासक्रम, शिक्षणाचे माध्यम व अपुरा वेळ यामुळे मुलांना क्लासेस मध्ये पाठवले जाते. पालकांना सकाळी झोपेतून उठवत नाहीत परंतु त्या वेऴी मुलांना अंघोळ घालून, टापटिप टाय बांधुन मुलांना बसस्टॉपवर उभे केले जाते. स्पर्धेच्या युगात मुलांचं बालपण हिरावून घेतलेलं आहे. 
                           
मुलांच्या वर्तनाबाबत पालकांच्या व शिक्षकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. मुलं ऐकत नाहीत, वाचत नाहीत. क्लासमध्ये शिकून आले असल्यामुळे वर्गात लक्ष देत नाहीत. मुलांना ओरडण्याची, बोलण्याची तर सोयच राहीलेली नाही. मुलांना मारणं म्हणजे स्वत:च्या नोकरीवर पाणी फेरणे किंवा तुरुंगवास स्विकारणं. वर्गात अर्धा तास शिकवणं म्हणजे एक मोठं दिव्यंच झालं आहे. पालकांकडे तक्रार करावी तर पालकही हतबलं असतात. मुख्याध्यापक हात झटकून टाकतात. यामुळे केवळ मुलंच नाही तर पालक व शिक्षकही प्रचंड तणावाखाली आहेत. अशैक्षणिक कामांचा प्रचंड ताण शिक्षकांवर आहे. बिएलओ ते अॉनलाइन सर्व प्रकारची कामे शिक्षकांना करावी लागत आहेत. अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जाण्याची मानसिक तयारी करावी लागते. 

याला फार मोठ्या प्रमाणात शिक्षण खातेही जबाबदार आहे. त्यांनी शाळेतील कला, क्रीडा शिक्षक हद्दपार केला. संचमान्यतेतून त्याचं वेगळ अस्तित्वच मिटवून टाकलं. जे कला, क्रिडा शिक्षक  शाळेत उरलेत त्यांना विषय शिक्षक बनवलं. यातून मुलांना खेळ दुरापास्त झालाय. शहरीकरणामुळे क्रीडागणं उपलब्ध नाहीत. अंगणं राहिली नाहीत. मुला, मुलींना घर म्हणजे क़ोंडवाडा झालेला आहे. त्यामुळं घरात बसून ती सोशल मिडियाच्या आहारी गेलेली आहेत. घरात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणीही उपलब्ध नाहीत. ही मुलं जेंव्हा पाळणाघरात वाढतात तेंव्हा ती एकलकोंडी, अशक्त, अकाली चष्मा लागलेली दिसतात.  

अशा पिढीचं एकमेव अशास्थान शिक्षक आहे. शिक्षकांनी आपले अध्य़यन विद्यार्थीकेंद्री करायला हवं. विद्यार्थ्यांना मुळ ज्ञान स्त्रोतापर्यंत  घेऊन जातो तोच खरा शिक्षक. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेप्रमाणे शिकत असतो मात्र त्याच्या मनात ज्ञानाच्या बिया टाकण्याचं व त्यापासून उगवलेल्या रोपाचे संगोपन करण्याचं महत्त्वपूर्ण काम शिक्षकाला करावं लागतं. विद्यार्थी नकारात्मक न राहता सकारात्मक कसा राहील या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचं असतं. त्यासाठी शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवलं ठेवायला हवं. आज विद्यार्थी टेक्नोसेवी झालेले आहेत. आज एका क्लिकवर त्यांना हवी ती माहिती मिळते. संगणकावर किंवा इंटरनेटवर मिळालेली माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे विद्यार्थ्यांना पटवून द्यायला हवे. माहिती केवळ गोळा करायची नाही तर माहितीचं सुक्ष्म वाचन कसं करायचं, त्याचं विश्लेषण नेमके कसं करायचं आणि त्यातून आपण नेमकं काय घ्यावं हे सांगायला हवं. याबाबतचा साधकबाधक विचार विद्यार्थांना देणं ही आधुनिक शिक्षकाची महत्वाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी टेक्नोसेवी होणं गरजेचे आहे.  विद्यार्थी केंद्रित आपली अध्यापन पद्धती व्हायला हवी. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मुलांना आवडतील अशा नवनवीन योजना आणि  आडाखे शिक्षकांचे तयार असायला हवे. पिढी दर पिढी बदल होतंच असतात.. आणि दोन पिढीतील दरीही! यासाठी पाल्य किंवा विद्यार्थी  यांच्या कलाने, त्यांची बाजू समजून घेऊन त्यांच्याशी पालक - शिक्षकांनी संवेदनशीलपणे वागण्याची गरज आहे. तरच पुढील पिढीशी समन्वय साधून अपेक्षित बदल नक्कीच घडवून आणता येईल!                            

जालिंदर देवराम सरोदे          
प्रमुख कार्यवाह,                        
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य .                                
अध्यक्ष- मुंबई ग्रॅज्युएट फोरम.

Saturday 7 December 2019

अनुदानित, सरकारी शाळांतील शिक्षणावर व शिक्षकांवर गंडांतर


४ डिसेंबर २०१९ रोजी शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेल्या प्रश्नांवर आयुक्त विशाल सोळंकी य़ांनी 32 अभ्यासगट नेमलेले आहेत. या अभ्यासगटातील काही तरतुदी या गंभीर आहेत. हा अभ्यासगट बरखास्त करणे अत्यंत गरजेचे आहे. या तरतुदी लागु झाल्यानंतर राज्यातील अनुदानीत व सरकारी शाळा उद्धवस्त होतील.   

१) या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक  ६  हा भयानक आहे. हा मुद्दा वाचला असता व्हावचर सिस्टिमची टिपणी या अगोदर मंत्रीमडळासमोर ठेवलेली होती. त्यावर सविस्तर अभ्यासाठी अभ्यास समिती गठीत केलेली आहे. यामुळे शिक्षकांना पगार देण्याऐवजी प्रती विद्यार्थ्यी अनुदान देण्याची योजना अंमलात आणण्याची तयारी सुरु झालेली आहे. ही व्हावचर सिस्टीम म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला सरकार वर्षभर फी चे कूपन देणार. मुलांनी हव्या त्या शाळेत प्रवेश घ्यावा. यामुळे जिल्हा परिषद शाळा, अनुदानित शाळा या बंद पडतील. ज्या वर्गात विद्यार्थी कमी त्या शिक्षकाचा पगार कमी. शिवाय ती रक्कम संस्थेकडे व त्याच रकमेतून शाळा चालवायची आहे.  ही अतिशय भयंकर पद्धत राबवण्यासाठी मागील सरकारने आदेश दिलेले होते. ‍व्हावचर सिस्टीम पद्धतीचे चिली आणि पाकिस्तानत प्रयोग फसलेले आहेत. असं असतानाही राज्यातील अनुदानीत व सरकारी शिक्षण उद्धवस्त करण्यासाठी ही योजना अंमलात आणत आहेत. याला तीव्र विरोध करायला हवा. अन्यथा राज्यातील सर्व सरकारी शाळा उद्धवस्त होतील. शिक्षकांचे पगार विद्यार्थी संख्येवर अवलंबून राहतील. तसेच अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे वेतन ताबडतोब बंद होईल. पेन्शन व त्या अनुषंगाने होणारे लाभ आपोआप बंद होतील.                                                          

२) या निर्णयातील मुद्दा क्रमांक १० हा सुद्धा परिसरातील विविध संस्थांच्या शाळांचे एकत्रीकरण करणे हा आहे. यापूर्वीचे शिक्षण सचीव नंदकुमार यांनी येथून पुढे केवळ  १००० पटसंख्येच्या शाऴाच चालू रहातील. राज्यातील ८० हजार शाळा बंद होतील. हा अजेंडा राबवण्यासाठी  हा अभ्यासगट निर्माण केला आहे. यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरतील. छोट्या शाळा बंद कराव्या लागतील. अादिवासी विभाग, डोंगर द-यातील व वाड्या वस्त्यांवरच्या शाळा बंद करुन एकच शाळा अस्तित्वात राहील. यामुळे प्राथमिक शाळेतील मुलींना पालक ३ ते ४ किलोमीटर दूर पाठवणार नाहीत. ग्रामिण भागातील शाळा बंद पडतील.     
                      
३) यातील मुद्दा क्रमांक २६ हा देखील गंभीर आहे. सरकारला आरटीई कायद्यानुसार  शाळांना भौतिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी आहे. सरकारला ही जबाबदारी नाकारायची आहे. त्यामुळे सीएसआर फंड व ऐच्छिक सहभाग हा मुद्दा अभ्यासगटात आणलेला आहे.  याचा अर्थ शाळा चालवायला सरकार पैसा देणार नाही. शिक्षकांनी डोनेटर शोधावेत किंवा स्वत: ऐच्छिक सहभाग नोंदवत पैसे खर्च करत शाळा चालवाव्यात. अनुदानित व सरकारी शाळा उद्धवस्त करण्याचा डाव आहे.   याला आपण सर्वांनी मिळून विरोध करायला हवा.   
                                                    
आयुक्तांनी नेमलेला हा अभ्यासगट तात्काळ रद्द करणे गरजेचा आहे. तसेच संचमान्येतेसाठी पुर्वीचीच पद्धत अवलंबिली पाहीजे. एसएसकोड व शाळा संहितेतील तरतुदीनुसार संचमान्यता व्हावी. जेणेकरुन विद्यार्थ्यांना विषयाला शिक्षक मिळेल. कला, क्रिडा शिक्षक ही प्रत्येक विद्यार्थ्याना उपलब्ध होतील. जुन्या परिपत्रकानुसार १५, २० व २५ विद्यार्थ्याची तुकडी संकल्पना अस्तित्वात आणावी.                                
या परिपत्रकातील  मुद्दे अतिशय गंभीर आहेत. त्यांना जोरदार विरोध करायला हवा. शिक्षक भारतीच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होणार आहे. आमदार कपिल पाटील साहेब यांच्याशी चर्चा करुन पूढील लढाईचा निर्णय जाहीर होईल. सरकार जोपर्यंत हा निर्णय मागे घेत नाहीत तो पर्यंत लढाई चालू ठेवावी लागेल.                                                                      

जालिंदर देवराम सरोदे                                                                      
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य.                                    
अध्यक्ष- मुंबई ग्रॅज्युएट फोरम.