Saturday 29 February 2020

आजच्या काळातील शिक्षकांची बदललेली भूमिका

"छडी लागे छमछम, विद्या येई घमघम" आचार्य अत्रेंच्या 'सानेगुरुजी' या चित्रपटातील गीत आपणा सर्वांना सर्वश्रूत व सर्वज्ञात आहे. खरोखर जर आपण आपलं बालपण आठवलं तर या गाण्याची प्रचिती आपणाला सर्वांनाच आलेली असेल. 

शिक्षक- विद्यार्थी आणि शिक्षा हे समीकरण जणू सर्वमान्य होते. त्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षकांवर असलेल प्रेम आणि शिक्षकांची विद्यार्थी प्रतीची निष्ठा ही वादातीत होती.  आपल्या मुलाच्या उद्धाराचे एकमेव आशास्थान पालकांना शिक्षक हे वाटत होते. विनानुदानित शाळांचे फॅड त्या काळात नव्हते. सरकारी शाळा याच शिक्षणाच्या माहेरघर होत्या. शाळेऐवजी 'शिक्षण' हे प्रतिष्ठेचं मानलं जायचं. साहजिकच शाळांमधील शिक्षकांना समाजात प्रचंड आदर होता. शिक्षकही प्रत्येक विद्यार्थी आपलं मुल आहे असं समजून त्याला ज्ञानदान करायचा. 

शिक्षक हा अभ्यासक्रमात अडकणारा नव्हता. त्याला कोणत्याही प्रकारच्या अशैक्षणिक कामाचं ओझं नव्हतं. शिक्षक विद्यार्थ्यांचाच नव्हे तर पालकांचाही मार्गदर्शक होता. त्या काळातील पाठ्यपुस्तक ही मर्यादित अभ्यासक्रमावर आधारीत होती. शिक्षक हेच केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे साधन होते. वर्गातील विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शाळेत त्या गोष्टीचा सराव चालायचा. पाढे म्हणणे, बाराखडी म्हणणे, श्लोक पाठांतर करणे, कविता पाठांतर करणे अशा अनेक गोष्टीं शाळेत सुरु असायच्या. शिक्षक हे शाळेच्या जवळच राहायचे. प्रवासाची फारशी वैयक्तिक साधने शिक्षकांना उपलब्ध नव्हती. साहजिकच शिक्षक हा पूर्णवेळ विद्यार्थ्यांना देऊ शकायचे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक रात्री अभ्यास घ्यायचा. सुट्टीच्या दिवसातही शाळा भरायची. 

शिक्षकांचा पगार हा अत्यंत तुटपुंजा होता. बहुतांशवेळा शिक्षकांच्या घरी पालेभाज्या, अन्नधान्य पालक मंडळीच पुरवायची. शिक्षक व पालक यांच्यामध्ये एक अनोखे नाते असायचे. पालकांचं म्हणणं असायचं विद्यार्थ्याला हवी तेवढी शिक्षा करा परंतु त्याला अभ्यास यायलाच हवा. यात केवळ आपल्या मुलांचं भलं व्हावं एवढी प्रांजळ इच्छा पालकांची होती. 

शिक्षक हे सुद्धा डीएड अथवा बीएड झालेले असत. केवळ गुणवत्ता असणारे विद्यार्थी हे डीएड अथवा बीएडला प्रवेश घेऊ शकत. विनाअनुदानित डीएड अथवा बी.एड कॉलेजेस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेवर प्रवेश मिळत असे. ज्ञानार्जन करणे हा एकमेव उद्देश शिक्षक होण्यामागे असायचा. त्यामुळे शिक्षक आपल्या पेशाशी प्रामाणिक राहून काम करत. प्रसंगी पदरमोड करून विद्यार्थ्यांना शिकवत. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे संबंध सौहार्दाचे असायचे. शिक्षकांना अध्यापन करताना मुक्त वावर असायचा. शिक्षक आपल्या वर्गात मुलांच्या इच्छेप्रमाणे अध्यापन करायचा. त्या काळात नापास व्यवस्था अस्तित्वात होती त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा कस लागायचा. मुलं शाळेला व शिक्षकाला गंभीरतेने घेत. शिवाय विद्यार्थ्याला क्षमता प्राप्त झाल्याशिवाय वरच्या वर्गात प्रवेश मिळत नसे. तीन वर्षे नापास होणाऱ्या मुलाला शाळेतून काढून टाकले जायचे. मानसशास्त्रीय दृष्टय़ा वरील बाबी योग्य नसल्या तरी तत्कालीन समाजाने या सर्व बाबी स्वीकारल्या होत्या. मुलांमध्ये व पालकांमध्ये शिक्षकांविषयी आदरयुक्त भीती होती. आपणाला शिकवणारे शिक्षक आजही भेटले तर आपण त्यांचे चरणस्पर्श करतो. परंतु ही परिस्थिती आता आढळत नाही.  

आजच्या काळात शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये हे नातं आढळत नाही. आज परिस्थिती प्रचंड बदललेली आहे. विद्यार्थी - शिक्षक व पालक यांच्या मानसिकतेतही बदल झालेला जाणवतो. पाचव्या वेतन आयोगापासून शिक्षकांचे पगार सन्मानजनक वाढलेले दिसतात. याच काळात विनाअनुदानित डीएड व बीएड कॉलेज खिरापतीसारखी सरकारने वाटली. लाख-लाख, दोन- दोन लाख डोनेशन देऊन त्यासाठी प्रसंगी आपली जमीन गहाण ठेवून विद्यार्थी डीएड व बीएड कॉलेजेस जॉइंट करू लागली. या विनाअनुदानित कॉलेजेसला कोणतीही गुणवत्ता यादी लागत नाही. केवळ पैसा हाच एकमेव प्रवेशाचा निकष होता. या कॉलेजेस मध्ये कोणतेही दर्जेदार व प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवायला उपलब्ध नाहीत. ही कॉलेजेस केवळ पैसे घेऊन डिग्री विकणारी कॉलेजेस झाली. विद्यार्थी ज्यावेळी या कॉलेजे मधून प्रशिक्षित पदवी घेऊन बाहेर पडत होते. तोवर शासनाने शाळांचे वेतनेतर अनुदान बंद केल्यामुळे शाळा व संस्था या शिक्षकांकडून पैसे घेऊ लागल्या होत्या. सहाजिकच या विद्यार्थ्यांना पुन्हा दहा ते पंधरा लाख नोकरीसाठी द्यावे लागायचे. डोनेशन देऊन पदवी घेतलेल्या व नोकरीला लागलेल्या शिक्षकाची विद्यार्थ्यांवर, शिक्षणावर निष्ठा कशी राहील?  

अध्यापनाबाबतची निष्ठा सहाजिकच अशा नियुक्त शिक्षकांमध्ये कमी प्रमाणात पहावयास मिळते. परंतु यातील काही शिक्षक हे आजही निष्ठेने विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. या शिक्षकांना नोकरी लागल्यानंतरही तीन वर्षे शिक्षण सेवक व सेवानिवृत्त झाल्यावर जुनी पेन्शन योजना लागू नाही. त्यामुळे या शिक्षकांचा बराच काळ संघर्ष करावा लागत आहे. शिवाय शासनाने आपली धोरणं बदलली आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षा करणे हा फार मोठा गुन्हा गणला गेलाय. शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या. 

इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळा व इतर बोर्डांच्या शाळांचे स्तोम माजले आहे. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळां ऐवजी चकचकीत शाळांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पूर्वी पालकांना दोन- दोन, तीन- तीन मुले असंत. त्यामुळे सहाजिकच मुलांकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नसायचा. आता केवळ दोन किंवा एकच मूल पालकांना असते. साहजिकच ते मूल खूप लाडात वाढलेले असते. मुलांसाठी कोणतीही गोष्ट करण्यास पालक पुढे मागे पाहत नाहीत. कायद्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करणे अथवा शिक्षा करणे नॉनबेलेबल गुन्हा ठरला आहे. कोणत्याही ही विद्यार्थ्याला आता आठवीपर्यंत नापास करायचं नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षणाचे व शिक्षकांचे गांभीर्य विद्यार्थी व पालकांमध्ये राहिलेले नाही.  समाजातील शिक्षकांचा सन्मान हा आपोआप दूर झाला. आज शिक्षकाला वर्गांमध्ये तीस मिनिटे सलग शिकवणे दुरापास्त झाले आहे. वर्गात शिकवणं फार कठीण झाले आहे. आज या व्यवस्थेमध्ये शिक्षकाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण राहीले नाही. त्यामुळे शिक्षक हा प्रचंड तणावाखाली शाळेत वावरत असतो. विद्यार्थ्यांनी केलेली कोणतीही गैरकृती ही शिक्षकांना त्रासदायक ठरते. विद्यार्थ्यांनी वर्गात दिलेला त्रास किंवा वर्गात वापरलेले अपशब्द, दिलेला अभ्यास पूर्ण न करणे कोणत्याही कारणाबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येत नाही. शिक्षकाला विद्यार्थ्यांची तक्रार करता येत नाही मात्र विद्यार्थ्यांनी केलेली तक्रार शिक्षकाला नोकरी गमावण्यास कारणीभूत ठरू शकते. शासनानेही शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा प्रचंड बोजा लादलेला आहे. नवीन संच मान्यतेनुसार शाळेतील शिक्षकांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. शिवाय आपण पदवी घेतलेल्या विषयाव्यतिरिक्त इतर विषयांचे अध्यापन करणं शिक्षकांवर बंधनकारक झालेले आहे.   

ऑनलाईन कामांमुळे शिक्षकांचं शिकवणं थांबलेलं आहे. माहितीच्या जंजाळात शिक्षक अडकलेला आहे. शेकडो प्रकारच्या माहिती शिक्षकाला  द्याव्या लागत आहेत. निवडणूक आयोग, आरोग्य विभाग, ग्रामविकास विभाग, महिला बालकल्याण अशा अनेक विभागाच्या ड्युट्या शिक्षकांना कराव्या लागत आहेत. शिवाय शाळेत शालेय पोषण आहार तयार करणे, त्यांची रजिस्टर मेंटेन कर ही कामे शिक्षकांना करावी लागतात. यात काही अनियमितता आढळली तर निलंबनासाठी तयार राहावं लागतं. आज शिक्षक हा प्रचंड मानसिक दबावाखाली वावरत आहे. अशैक्षणिक कामांच्या ओझ्याने दबलेला आहे . शासनाच्या वारंवार बदलणाऱ्या धोरणामुळे तो अस्थिर झाला आहे. शिक्षकाला स्थिर करणे, सन्मान देणे, शिक्षकाला फक्त विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम देणे गरजेचे आहे.  विनाअनुदानित डीएड व बीएड कॉलेजेस ताबडतोब बंद करायला हवीत. सरकारी डीएड व बीएड कॉलेजेस पुन्हा पूर्ववत सुरु करावी लागतील. गुणवत्तेनुसारच डीएड व बीएड कॉलेजमध्ये विद्यार्थांना प्रवेश मिळायला हवा. राज्याला व देशाला जितक्या शिक्षकांची गरज आहे तितकेच शिक्षक तयार करायला हवेत. डीएड व बीएडला जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी टीईटी अथवा सीटीईटी परीक्षा पास व्हायला हवी. अशी परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना डीएड अथवा बीएडला प्रवेश द्यावा. तरच राज्यात गुणवत्ताधारक व दर्जेदार शिक्षक शाळांना उपलब्ध होऊ शकतात. 

शिक्षकांना होणा-या शारिरीक व मानसिक त्रासामुळे मधुमेह, बी.पी, थायरॉईड, हृदयविकार हे आजार होऊ लागले आहेत. अशैक्षणिक कामांचा बोजा व प्रशासकीय दबाव अनावर होऊन शिक्षकही आता नको ती पावले उचलू शकतात. काही ठिकाणी तर उचलली गेली आहे. शिक्षक वाचला तरच समाज वाचेल. आतातरी राज्यातील  शिक्षणाचा व शिक्षकांचा विचार  सरकार करेल काय? 

श्री. जालिंदर देवराम सरोदे
प्रमूख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य.
अध्यक्ष  - मुंबई ग्रॅज्युएट फोरम.

Thursday 20 February 2020

राज्यमंडळाला पर्याय सीबीएसई, आयसीएसई बोर्ड?

मागील आठवड्यात वृत्तपत्रात एक बातमी वाचली "राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी राज्यभर सीबीएसई व आयसीएसईच्या शाळा सुरू करण्याची घोषणा" ही बातमी वाचून शिक्षण क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला. गेल्या पाच वर्षांत शिक्षण क्षेत्रात जे काही फेरबदल केले गेले. त्यामुळे राज्याची अनुदानित शिक्षण व्यवस्थाच संपून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता नवीन सरकार आल्यावर शिक्षणक्षेत्राला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. नवीन शिक्षणमंत्र्यांकडून जास्त सखोल व सकारात्मक निर्णयाची अपेक्षा होती. परंतु शिक्षणमंत्र्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी धक्कादायक आहे. राज्याच्या राज्य मंडळावर अविश्वास दाखवणारा आहे. राज्याच्या प्रगत शिक्षण क्षेत्राला काही पावले मागे नेणारा आहे. 

राज्याचे शिक्षण मंडळ दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करण्याऐवजी तैनाती फौजे सारखी केंद्रिय बोर्डाची मदत घेऊन राज्याची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न हा राज्याच्या शिक्षणाला मारक ठरणारा आहे. राज्य मंडळाची गणित व विज्ञान विषयाची पाठ्यपुस्तके ही तर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमापेक्षा ही जास्त दर्जेदार आहे असे शिक्षणतज्ज्ञांचे  मत आहे. असे असताना केवळ सवंग लोकप्रियतेसाठी व वेगळं काहीतरी करतेय हे दाखविण्यासाठी निर्णय घेतलेला दिसतोय. शिक्षणतज्ञांशी चर्चा किंवा त्यांचे मार्गदर्शन न घेताच हा निर्णय घेतलेला दिसत आहे. राज्यातील बऱ्याचशा माध्यमिक शाळा ह्या खाजगी संस्था चालवीत आहेत. असे असताना नक्की राज्य सरकार सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळा कोठे सुरू करणार याचा उलगडा होत नाही.  

१९८१ पासून राज्यमंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या एकाही शाळेला सरकारने अनुदान दिलेले नाही. राज्य सरकारने एमईपीएस अॅक्ट व एसएसकोड मध्ये तशी तरतूद केलेली आहे. राज्य सरकार इथे राज्य मंडळाच्या इंग्रजी शाळांना अनुदान देत नाही. मात्र सीबीएसई आणि आयसीएसईच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देणार. राज्याच्या शिक्षणमंत्री अशी भूमिका कशी काय घेऊ शकतात ? राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमात काही त्रुटी किंवा उणिवा असल्यास त्या उणीवा भरून काढण्यासाठी व दर्जा वाढवण्यासाठी राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. राज्य अभ्यासक्रम मंडळावर समाजशास्त्रज्ञ, गणित तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, विविध विषयांचे अभ्यासक, लेखक, कवी इत्यादी तज्ज्ञ मंडळींची नेमणूक करता येईल. केंद्रिय बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचे धोरण राज्यशासन राबवणार असेल तर याचा सरळअर्थ  असा की राज्य बोर्डाच्या शाळांवर व एकंदरीत राज्य मंडळावर सरकारचा विश्वास नाही. मग प्रश्न पडतो की इंग्रजी मानसिकतेचे व केंद्रीय बोर्डाचे गुलाम झालो की काय? 

मुंबई महानगरपालिकेने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु महानगरपालिका, गेली २०वर्ष अनुदान मागणा-या १०४  शाळांना मात्र अनुदान देत नाही. ज्या महानगरपालिकेवर मराठी भाषिकांच्या नावाने राज्य करणा-यांचा झेंडा आहे. जे मराठी भाषेचा कायमच उद्घोष करत आहे , दिंडोरा पिटत आहे. ज्यांनी मराठीचा मुद्दा पुढे करून सत्ता प्राप्त केली त्याच सरकारने मराठी शाळांना संपविण्याचा घाट घातला आहे की काय? सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांना अनुदान द्यायचे मात्र मराठी माध्यमाच्या शाळांना अनुदान नाकारायचे हा काय प्रकार चालू आहे.
   
आता राज्य सरकारही हा कित्ता गिरवत, इतर बोर्डाच्या शाळांना पायघड्या पसरत आहे. राज्यमंडळाच्या हजारो शाळांमध्ये प्रचंड विद्यार्थी संख्या आहे परंतु त्यांना अनुदान द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. शिक्षणमंत्र्यांनी जर हे धोरण तात्काळ मागे घेतले नाही तर राज्य मंडळाच्या शाळांमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य निर्माण होईल. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा अभ्यास राज्यातील शाळांमधून शिकवला गेला तर महाराष्ट्राचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत कोण पोहोचवणार? सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ चार ओळीचा दिला आहे. जगाने प्रेरणा घेतलेल्या या महापुरुषांची दखल जर आपल्याच राज्यात घेणार नसेल तर विद्यार्थ्यांकडून थोर परंपरेची अपेक्षा ठेवणे रास्त ठरेल काय? महाराष्ट्राचे आदर्श जर आपण त्यांच्यासमोर ठेवले नाहीत तर नवीन पिढी घडणार तरी कशी? संत ज्ञानेश्वरांपासून तर संत गाडगे महाराजांपर्यंत महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे. ही परंपरा सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात नाही.  एवढेच नव्हे तर संताजी, धनाजी, तानाजी, मल्हारराव होळकर, बाजीप्रभू , काह्नोजी आग्रे ही नावे तर त्यांच्या कानावरही पडणार नाहीत. संपूर्ण इतिहासच त्यांच्या आयुष्यातून पुसला जाईल. महाराष्ट्राचा भूगोल त्यांना कोण शिकवणार ? गड, किल्ल्यांची माहिती कोण देणार? महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे कोण शिकवणार? महाराष्ट्रातील लोक परंपरा, चालीरीती, वेशभूषा विद्यार्थ्यांना कशा कळणार? महाराष्ट्राची सांस्कृतिक व भौगोलिक स्थितीचे विद्यार्थ्यांना ज्ञान असणार नाही. 

सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकार आपल्या अस्मितेची ओळख कशी करून देणार? सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा या राज्य बोर्डापेक्षा लवकर होतात. राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवली किंवा आपत्ती जनक परिस्थिती झाली तर  राज्य सरकार या बोर्डांच्या शाळांच्या परीक्षेचे वेळापत्रक बदलू शकणार नाही. या बोर्डांच्या शाळांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. असे असताना प्रचंड पैसा   खर्च करून राज्य सरकारने  या बोर्डाच्या शाळा चालू करण्याचा निर्णय का घेतला असेल ? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. नवीन शिक्षणमंत्र्यांकडून एवढीच अपेक्षा आहे की, राज्यमंडळाचा अभ्यासक्रम दर्जेदार बनवावा. जर इतर बोर्डांचा अभ्यासक्रम सकस वाटत असेल तर राज्य मंडळाचा अभ्यासक्रम ही त्याच तोडीचा किंबहुना त्यापेक्षा चांगला बनवायला हवा. राज्य मंडळाच्या शाळांमध्ये मुले नाहीत ही खोटी धारणा आहे. आज शेकडो पालक सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमधून आपल्या मुलांना काढून राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत.

राज्यसरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे, पालकांचे, समाजाचे आणि पर्यायाने राज्याचे शैक्षणिक नुकसान होणार आहे . शिक्षणमंत्र्यांनी आपले धोरण बदलावे नाही तर त्यांना शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या तीव्र संतापास तोंड द्यावे लागेल. इतर बोर्डाच्या शाळा महाराष्ट्रात सरकारने सुरु केल्या तर त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील . मराठीच्या आणखी दयनीय अवकळेनला शिक्षणमंत्री आणि राज्य सरकारच जबाबदार राहील ! नवीन शिक्षणमंत्र्यांकडून आपल्याला सकारात्मक निर्णयाची , नव्या बदलाची अपेक्षा आहे ! पण ते बदल असे असायला हवेत की ज्यामुळे आपली परंपरा, संस्कृती, इतिहास यांचे जतन होऊन एक नवा महाराष्ट्र उदयाला येईल .नवीन शिक्षण मंत्री स्वतः प्राध्यापिका असल्याने  त्यांच्याकडून संपूर्ण शिक्षक वर्गाची, पालकवर्गाची आणि महाराष्ट्राची फार मोठी अपेक्षा आहे .ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी आता मात्र त्यांचीच आहे! त्या याबाबतीत सकारात्मक विचार करतील असा विश्वास ठेवण्यास हरकत नाही !! 

नाहीतर राज्यातील शिक्षण व्यवस्था शाबूत ठेवण्यासाठीची लढाई सुरु ठेवावी लागेल. 

जालिंदर देवराम सरोदे, 
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य. 
अध्यक्ष - मुंबई ग्रॅज्युएट फोरम.



Tuesday 11 February 2020

शिक्षक तणावात, शिक्षण संकटात?

काही वर्षांपूर्वी दोन-तीन सिनेमे आले होते. थ्री इडियट्स, शिक्षणाच्या आयचा घो, तारे जमीन पर या चित्रपटांमुळे शिक्षणक्षेत्र अक्षरशः ढवळून निघाले होते. विद्यार्थ्यांवर  असणाऱ्या ताणतणावांचं गांभीर्य प्रथमत: सरकारने जाणले. विद्यार्थांना दिल्या जाणाऱ्या शारीरिक अथवा मानसिक शिक्षा या फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. सर्व शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांचा विचार करायला लागली. 

विद्यार्थ्यांवर असणाऱ्या ताणामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. कोवळ्या जीवावर ताणामुळे अनेक आघात होत होते. वाढत्या आत्महत्यांमुळे महाराष्ट्र शासन खडबडून जागं झालं. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. 

आमदार कपिल पाटील यांनी मुख्याध्यापक, शिक्षण विभाग अधिकारी यांचे शिष्टमंडळ दिल्ली, बिहार, केरळ या राज्यांच्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. त्या शिष्टमंडळांचा अहवाल राज्यसरकारने स्वीकारला. त्यातून विद्यार्थी फ्रेंडली दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक बनविण्यात आले. त्यानंतर दहावीच्या परीक्षेचा दोन ते तीन दिवसांत एकाच विषयाचा पेपर घेण्यात येत आहे. दहावी-बारावीची गुणवत्ता यादी बंद करण्यात आली. पुढे दप्तराचं ओझं कमी करण्यात आलं. आठवीपर्यंत गुणांऐवजी ग्रेड सिस्टीम आणण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम झाला. बऱ्याच अंशी विद्यार्थी आत्महत्या आपणाला थोपवण्यात यश आलं. 

हे जरी सर्व खरं असलं तरी गुणवत्तेच्या बाबतीतील ओरड आजही कायम आहे. शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षण देणारा (शिक्षक) आणि शिक्षण घेणारा (विद्यार्थी) दोघंही आनंदी असायला हवेत तरच शिक्षण ही प्रक्रिया यशस्वी होते. यात विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही व्यवस्था विचार करू लागली पण खरंच राज्यातील शिक्षकही आनंदी आहेत का ? त्यांच्यावर तणाव आहे का ? तेही भयग्रस्त- चिंताग्रस्त  असतात का? या प्रश्नाचा जर व्यवस्थेने विचार केला नाही तर गुणवत्तेच्या बाबतीतली  ओरड कायम राहील. यासाठीच आपल्याला  प्रकर्षाने  या प्रश्नाचा  विचार करावा लागतो  तो म्हणजे  खरंच शिक्षक तणावात आहेत का ? 

शाळेतील वाढत असलेला ताण आणि कामांचा वाढत असलेला तणाव यांचा शिक्षकांवर विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः शहरातील शिक्षकांचा भावनांक (इमोशनल कोशंट ) कमी होत आहे. एका सर्वेक्षणात जवळपास चाळीस टक्के शिक्षकांमध्ये भावनांक कमी आढळला आहे तर ५०% पेक्षा जास्त शिक्षक हे तणावाखाली काम करत असल्याचे आढळले आहे. शाळा, प्रशासन व कुटूंब यात असलेल्या ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन न करता आल्याने शिक्षकांमध्ये नैराश्य वाढत चाललेले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये उच्च रक्तदाब, डोकेदुखी, हृदयरोग, थायरॉइड, मधुमेह यांसारखे रोग बळावलेले दिसत आहेत. ताण सर्वाधिकांना भेडसावणारी समस्या आहे. शिक्षकांना ताण आणि नैराश्य यांचं व्यवस्थापन करता येणे अत्यंत गरजेचं आहे. या बाबींवर सरकारने अत्यंत सखोल विचार करणे आवश्यक झालेले आहे.

राज्यात जवळपास ९० हजार प्राथमिक शाळा आहेत. यातील नव्वद टक्के शाळा या सरकारी व अनुदानित आहेत. या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना अशैक्षणिक कामाच्या जाेखडातुन मुक्ती हवी आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये राबवलेल्या बदली धोरणामुळे अनेक शिक्षकांचे कौटुंबिक स्वास्थ बिघडलेले आहे. ९०० कलमं असलेल्या या जीआरमधील कोणत्याही एका कलमाने शिक्षकांची बदली होऊ शकते. बदलीची सबळ उत्तरे कोणाकडेही नाहीत. शाळेत शालेय पोषण आहार, सरल उपक्रम, शाळासिद्धी, यूडायस प्लस, विविध शिष्यवृत्या यांची माहिती ऑनलाईन भरायची असते. परंतु या माहिती भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा, विजबील, नेट अथवा डिजिटल साहित्य शासनाकडून दिले जात नाही. माहिती अचूक व वेळेवर गेली नाही तर कारवाईचा बडगा सतत शिक्षकांच्या डोक्यावर असतो. शिवाय शाळेत आठ प्रकारच्या विविध समित्या नेमाव्या लागतात. त्याचा प्रोसिडिंग अद्ययावत ठेवावं लागतं.

शिक्षकांवर सर्वात मोठा ताण असतो तो व्हॉट्सअॅप प्रशासनाचा. या प्रशासनाचा व्हॉट्सअप मेसेज हा चोवीस तासात कधीही येऊ शकतो व दोन ते तीन तासांमध्ये ही माहिती केंद्रप्रमुखाला कळवावी लागते. शालेय व्यवस्थापन समितीला सोबत घेऊन कामे करणे हे फार मोठे दिव्य असतं. पुढा-यांची मर्जी संभाळणे व गावातील राजकारणाचा बळी न ठरणे ही फार मोठी कसरत असते. शालेय व्यवस्थापनात थोडी जरी चूक झाली तर शिक्षकाला निलंबनपर्यंतच्या कारवाईला सामोर जावं लागतं.  रोजंच निलंबनाची टांगती तलवार डोक्यावर ठेवून शिक्षक जर विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर तो विद्यार्थ्यांची समरस होऊन शिकवू शकेल काय? 

शिक्षकांना दिलेलं अशैक्षणिक कामांच जोखड सरकार फेकून देणार आहे की नाही? या अशैक्षणिक कामांच्या तणावामुळे कित्येक शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आत्महत्याही केलेल्या आहेत. ही व्यवस्था शिक्षकाला एकतर अप्रामाणिक बनवते नाहीतर भ्रष्टाचार करायला प्रवृत्त करते. प्रशासनाचा ऐकलं नाही तर निलंबनही करते. अशा कात्रीत सापडलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी राखावी. हा प्रश्न मग अनुत्तरितच राहतो! 

राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिकवणा-या शिक्षकांची स्थितीही वाईट आहे. यापूर्वी शिक्षकांना समाजात व शाळेत प्रचंड सन्मान मिळत होता. आज माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकाची अवस्था दयनीय झाली आहे. पूर्वी सारखा सन्मान आता विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना मिळत नाही. पालक मुलांच्या बाबतीत प्रचंड जागरूक झालेले आहेत. शिस्त नावाची गोष्ट आता शाळांमध्ये दिसत नाही. विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केले, अभ्यास केला नाही, शिक्षकांना अपमानित केले, वर्ग चालु असताना डिस्टर्ब केला तरीही शिक्षक विद्यार्थांना काहीही बोलू शकत नाही अथवा शिक्षा देऊ शकत नाहीत. शिक्षक हा शाळेतील वर्ग व्यवस्थापन करताना प्रचंड तणाव येत आहेत. ३० मिनिटांच्या तासिकेत सुद्धा शिक्षकांना वर्गात शिकवणे फार कठीण झालेले आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधणे अवघड होत आहे. अशैक्षणिक कामे व अभ्यासक्रम पुरा करणे या कात्रीत शिक्षक सापडला आहे.

शाळेत परीक्षेची ऑनलाइन माहिती भरणे, बीएलओ ड्युटी करणे असी अशैक्षणिक कामे आहेत. प्राथमिक शाळेप्रमाणे माध्यमिक शाळेत सुद्धा वर्गाला एकच शिक्षक दिला गेल्यामुळे सहा ते सात वर्गांना शिक्षकांना शिकवावे लागत आहेत. शिवाय दिवसभरात सलग आठ ते नऊ तासिका शिक्षकांना अध्यापन करावं लागतं आहे. सतत दोन- तीन मजल्यांची चढ-उतर करावी लागते. शाळेतील मुख्याध्यापक सहकार्य करणारे असतील तर ठीक नाहीतर विद्यार्थ्यांच्या समोरच शिक्षकांचा अपमान करणे, शाळा सुटल्यानंतर दोन- दोन, तीन- तीन तास बसवून ठेवणे. गरजेच्या वेळी शिक्षकांना सुट्ट्या न देणे. अशाप्रकारे मानसिक त्रास दिला जात आहे. शाळेला वेतनेतर अनुदान न दिल्यामुळे किंवा ते अनुदान पुरेसे नसल्यामुळे बऱ्याच माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा या शिक्षकांकडून कॉन्ट्रिब्युशन काढून चालवल्या जात आहेत.

सेवाज्येष्ठतेचे नियम सरकारने बदलल्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये डीएड विरुद्ध बीएड शिक्षकांची भांडणे सुरू आहेत.  संचमान्यतेचे निकष बदलल्यामुळे मराठी मध्ये पदवी असणाऱ्या शिक्षकाला इंग्रजी,  हिंदी हे विषय शिकवावे लागत आहेत. कला व पीटी शिक्षकाला विषय शिक्षक बनवले आहे. त्यांना शालेय विषय शिकवायला दिले आहेत. शिक्षकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. 

सरकारकडून शिक्षणाची व शिक्षकांची अवहेलना चालू आहे. दोन-दोन तास प्रवास करून शिक्षक सकाळी शाळेत येत आहेत. ट्रेन अथवा बसचा काही प्रॉब्लेम झाला आणि शिक्षकाला दोन मिनिटे उशीर झाला तरी शालेय प्रशासन त्यांचा लेटमार्क लावत आहेत. कोणत्याही माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत जाऊन आपण जर चौकशी केली तर शिक्षक प्रचंड तणावाखाली, दडपणाखाली वावरत आसल्याचे आपणाला जाणवेल. अतिरिक्त ताणामुळे अनेक शिक्षकांना प्रचंड व्याधी जडलेल्या आहेत. दहावी, बारावीचे पेपर आले तर शिक्षकांना प्रचंड त्रास होतो. शाळेतील सर्व तासिका शिकवून अॉफ़ पिरियडला पेपर चेक करावे लागतात. पेपर चेक करायला घरी घेऊन जाता येत नाही. पेपर जर घरी नेले तर जाताना ट्रेनचा अथवा बस प्रवास आणि या प्रवासात काहीही होऊ शकते. काही घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ? घरी जरी पेपर नेले तर शिक्षकांना तर पहाटे उठून अथवा रात्री जागून पेपर चेक करावे लागतात. शिवाय पेपर चेक करताना काही चूक झाली तर त्याला जबाबदार सुद्धा शिक्षकालाच धरले जाते. शालेय विषय शिकवून पंधरा दिवसांत पेपर चेक करून देणे प्रचंड मोठे दिव्य असते. पुन्हा शाळेची परीक्षा, पेपर चेक करणे, निकाल बनवणे. शिक्षक हा आता पूर्वीचा शिक्षक राहिलेला नाही. त्याला स्वतःचा आवाज राहिलेला नाही तो प्रचंड तणावाखाली आहे. 

एवढ्या तणावात असणा-या शिक्षकांकडून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा आपण कशी काय करू शकतो. आज शिक्षकाला त्याचा सन्मान हवा आहे, आज शिक्षकांमध्ये अनुदानीत, विनाअनुदानीत, टप्प्यावरचे, घोषित, अघोषित, जुनी पेन्शनवाले, आयसीटी असे असंख्य प्रकार आहेत. जो तो शासनाच्या निर्णयाकडे आस लावून बसलेला आहे. जर खऱ्या अर्थाने आपणाला राज्याची गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था वाचवायची असेल तर शिक्षण या प्रक्रियेतील शिक्षक हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याला आर्थिक व सामाजिक सन्मान द्यायलाच हवा. त्याला अशैक्षणिक कामाच्या जोखडातून दूर करायला हवे. त्याला मुक्त व आनंदी वातावरण अध्यापनासाठी मिळायला हवं. कोणत्याही दडपणाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांची अध्ययन- अध्यापन प्रक्रिया व्हायला हवी. तरच राज्यातील शिक्षण व्यवस्था सशक्त होईल. अन्यथा राज्याची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. 

जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य. 
अध्यक्ष, मुंबई ग्रॕज्युएट फोरम.