Friday 31 January 2020

राज्यातील शिक्षक खरेच अतिरिक्त आहेत का ?

शासनाने २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार नवीन संच मान्यता लागू केली. त्यानंतर कला व क्रीडा शिक्षकांना अतिरिक्त करणारा शासन निर्णय लागू केला. यामुळे राज्यातील माध्यमिक शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले. नवीन संचमान्यतेमुळे असा काय फरक पडला की हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले, याचा मागोवा घेतला असता सत्य परिस्थिती समोर येते. 

राज्यातील शिक्षक हे आपोआप अतिरिक्त झाले नाहीत तर त्यांना ठरविण्यात आले आहेत. माध्यमिक शाळांच्या वर्गातील विद्यार्थी संख्या जरी कमी झालेली असली तरी वर्गातील विद्यार्थ्यांचे शिकायचे विषय कमी झालेले नाहीत. त्यामुळे विषयांना शिकवणारे शिक्षक कसे कमी करता येतील. परंतु नवीन संच मान्यतेत विद्यार्थी संख्येची अट घालून शिक्षकांना जाणीवपूर्वक अतिरिक्त ठरविण्यात आले. एमईपीएस अॅक्टनुसार पूर्वी तुकडीला शिक्षक ही संकल्पना अस्तित्वात होती. त्यामुळे आठवी ते दहावीच्या प्रत्येक तुकडीला १.५(दिड) शिक्षक दिला जात असे. पाचवी ते सातवीच्या प्रत्येक तुकडीला (१.३) शिक्षक दिला जात असे. शिवाय कला व क्रीडा विषयांचे विशेष शिक्षकही दिले जात असत. शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करूनच शिक्षक विद्यार्थी प्रमाण ठरवले होते. या फॉर्म्युल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाला शिक्षक मिळत असे. ८ वी ते १० साठी पाच विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळत असंत. पाचवी ते सातवीसाठी चार शिक्षक मिळत असत. यामुळे शाळेमध्ये सर्व विषयांचे पदवीधर शिक्षक उपलब्ध होत असत. शिवाय २५० च्या वरती विद्यार्थी संख्या गेली की जास्तीचे क्रीडा व कला शिक्षक मिळत असत. त्यामुळे शाळेत प्रत्येक विषयाला न्याय देणारे शिक्षक विद्यार्थ्यांना मिळत असे. जुन्या संचमान्यतेत विद्यार्थी संख्या ही गृहीत धरली जात असल्यामुळे विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षकांचा वर्कलोड कमी किंवा जास्त होत असे. परंतु विद्यार्थ्यांना सर्व विषयांना शिकण्यासाठी  शिक्षक मिळत असत. 

यानंतर २८ ऑगस्ट २०‍१५ च्या शासन निर्णयाचा फटका कसा बसला याचा विचार करता येईल. या शासन निर्णयानुसार तुकडी ही संकल्पना रद्द करून विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक ही संकल्पना अस्तित्वात आली. सहावी ते आठवीच्या गटातील विद्यार्थ्यांना पस्तीस विद्यार्थ्यांमागे केवळ एक शिक्षक मिळाला. त्यामुळे जर सहावी ते आठवीच्या वर्गात एकुण ८० विद्यार्थी असतील तर तीन वर्गांसाठी केवळ २ शिक्षक संचमान्यतेनुसार मंजूर होत‍ात. दोन शिक्षक आणि सहावी ते आठवीचे सर्व विषय यांमुळे शाळेत शिक्षक- विद्यार्थी रेशो याचा मेळच बसत नाही. ज्या वर्गांना पूर्वी चार शिक्षक मिळत होते तिथे केवळ दोनच शिक्षक आता मिळत आहेत. शिवाय कला, क्रीडा शिक्षकांचा विशेष शिक्षक हे संचमान्यतेतील स्वतंत्र पद ही काढून घेण्यात आले आहे शिवाय त्यांना विषय शिक्षक म्हणून गणण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेेत. 

खरे तर जुन्या संचमान्यतेनुसार राज्यभरात माध्यमिक विभागात शिक्षकांच्या किमान पन्नास  हजार जागा भरायच्या बाकी होत्या . परंतु शिक्षण विभागातील काही झारीतील शुक्राचा-यांनी या जागा भरण्याऐवजी राज्यभरातील हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरविणारा २८ ऑगस्ट २०१५ चा शासन निर्णय आणला. यासाठी आरटीई कायद्याचा आधार घेण्यात आला. खरंतर आरटीई कायदा आल्यानंतर राज्यभरातील शिक्षकांना  प्रचंड आनंद झाला होता. आरटीई कायद्यानुसार राज्यातील मुलांना विषयाला शिक्षक मिळणार होता. १०० मुलांमागे अर्धवेळ कला, क्रीडा व कार्यानुभव विषयाचे शिक्षक मिळणार होते. याचा अर्थ २०० मुलांमागे शाळेला पूर्णवेळ कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक आरटीई कायद्यानुसार देय होते. परंतु कायद्याचा दुरुपयोग केला गेला. कला, क्रीडा शिक्षकांना कितीही पटसंख्या असली तरी २५०० रुपये मानधनावर नेमण्याची तरतूद करण्यात आली. तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ त्याला नोकरीवर न ठेवण्याचे बंधन घालण्यात आले. आरटीई कायद्यात किमान(atleast) ३० मुलांमागे एक शिक्षक ही तरतूद आहे. याचा अर्थ ३० विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षकही देऊ शकतो परंतु 

कायद्याचा उलटा अर्थ काढून राज्यातील अनुदानीत शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागाने केला. ३० व ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक देण्यात आला. वर्गात जर तीस किंवा पस्तीसपेक्षा जास्त विद्यार्थी असतील आणि शाळेला जर शिक्षक हवा असेल तर त्यांना स्वतंत्र वर्ग खोलीची अट घालण्यात आली. त्यामुळे शाळेत सहावीच्या वर्गात ७० मुले असली तर त्यांना केवळ एकच शिक्षक अनुज्ञेय झाला. त्यामुळे ज्या ठिकाणी विद्यार्थी जास्त आहेत त्या ठिकाणी सुद्धा शिक्षक संख्या वाढवली नाही. मात्र ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी भरली त्या ठिकाणचे शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले. या शासन निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले. त्यामुळे शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त वर्कलोड वाढला आहे. मराठी, इंग्रजी हिंदी या तीन विषयांसाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध आहे. गणित- विज्ञानासाठी एक शिक्षक व समाजशास्त्रासाठी एक शिक्षक. त्यामुळे मराठी विषयात पदवी असणाऱ्या शिक्षकाला इंग्रजी अथवा हिंदी हे विषयही शिकवावे लागत आहेत. गुणवत्तेचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. शाळेतील मुख्याध्यापकांना शिक्षकांना विषय शिकवायला देताना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवतानाही शाळेमध्ये प्रचंड ताण तणाव निर्माण झालेले आहेत. नक्की अतिरिक्त कोण यावरून शिक्षकांमध्ये हेवेदावे सुरू झाले आहेत. काही शाळांमध्ये मर्जीच्या शिक्षकांना शाळेत ठेवण्यात आले व नकोशा शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले.  शिक्षणाधिकाऱ्यांकडे हजारो शिक्षकांनी तक्रारी केलेल्या आहेत. शाळेतील वातावरण कलुषित झालेलं आहे. शिक्षकांना मुख्याध्यापक देईल तो विषय शिकवावा लागत आहे. शाळेत नऊच्या नऊ तासिका शिक्षकांना वर्गात उभे राहून शिकवावं लागत आहे . अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाने आपल्या पदरी बीएलओ डय़ुटीसाठी नियुक्त करून घेतलेले आहे. त्यांच्यावर  कामाचं प्रचंड प्रेशर टाकून व धमक्या देऊन त्यांना अपमानित केलं जात आहे. वर्गातील विद्यार्थी जरी कमी झालेले असले तरी विषय कमी झालेले नाहीत. त्यामुळे सर्व अतिरिक्त शिक्षकांना पुन्हा आपापल्या शाळेत जाऊन शिकवायला द्यायला हवं. २८ ऑगस्ट २०१५ चा शासन निर्णय व ७ ऑक्टोबर २०१५ चा शासन निर्णय रद्द करायला हवा. तरच राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण टिकू शकेल. 

जसे जसे विद्यार्थी वरच्या वर्गात जातील तसे तसे त्यांना विषयातील स्पेशलायझेशन झालेले शिक्षक शिकवायला उपलब्ध करून द्यायला हवेत. तरच शिक्षणाचा दर्जा वाढेल. एमईपीएस अॅक्ट व एसएस कोड मधील तरतुदी बाजूला ठेवून शासन केवळ परिपत्रक काढून राज्यातील शिक्षकांना अतिरिक्त ठरवत आहे. हा राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळण्याचा प्रकार आहे. हे ताबडतोब थांबायला हवे. राज्यातील नव्या शिक्षणमंत्री या स्वतः शिक्षिका आहेत, संवेदनशील आहेत. मला खात्री आहे की त्या विद्यार्थी पूरक निर्णय घेतील व राज्यातील गोरगरीब,शेतकरी, दलित, वंचितांच एकमेव आशास्थान असलेलं अनुदानित शिक्षण वाचवतील. आपण फक्त  वाट बघायची आहे सकारात्मक बदलाची, उचित निर्णयाची!!!  

जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य

Saturday 18 January 2020

राज्यातील शिक्षक, कर्मचारी कोणाचे?

शिक्षण विभागाचे की निवडणूक आयोगाचे! 

राज्यभर शिक्षणक्षेत्रामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्य सरकारने शिक्षणक्षेत्रावर ज्या प्रकारची आक्रमणे केलीत त्यातून शिक्षकांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था व नैराश्य आलेले आहे. राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामांनी बेजार केलेलं आहे. सरकारी पातळीवरून रोज नवे फतवे निघत आहेत. शालेय पोषण आहारापासून ते ऑनलाइन कामापर्यंत. शाळा सिद्धी पासून ते  इमारतीच्या बांधकामापर्यंत सर्वच कामे शिक्षकांनी करावयाची आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना किमान सदतीस प्रकारची वेगवेगळी स्वरुपातील कामे करावी लागत आहेत. या अशैक्षणिक कामातून वेळ मिळाला तर त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे. शाळेतील मुख्याध्यापक किंवा शाळा प्रमुख यांना तर कोणत्याही वेळेस माहिती घेऊन केंद्रप्रमुखांकडे धावपळ करत जावं लागतं. सर्व सरकारी उपक्रम, धोरणं राबवण्याचं एकमेव साधन म्हणजे राज्यातील शिक्षक. कुत्री,  मांजरं, उंदीर यांची गणती सुद्धा शिक्षकांनाच करावी लागते. हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी सकाळी शौचास बसणाऱ्या लोकांना मोजण्याची जबाबदारीही शिक्षकांवरच असते. शिवाय कोणतेही काळ-वेळेचे नियोजन नसलेले शिक्षक प्रशिक्षण. शाळा या कित्येक दिवस अपु-या शिक्षकांविना चालवाव्या लागतात. 

राज्यातील माध्यमिक शिक्षणाची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. नवीन संचमान्यतेमूळे प्राथमिक शाळांसारखीच परिस्थिती माध्यमिक शाळांची झालेली आहे. माध्यमिक शाळांमध्ये आता वर्गाला केवळ एकच शिक्षक शिकवायला उरलेला आहे. तीन(मराठी, हिंदी, इंग्रजी) भाषा शिकवायला केवळ एक शिक्षक. गणित, विज्ञान विषय शिकवायला एक शिक्षक. अक्षरशः शिक्षणाचा बट्टय़ाबोळ करून टाकला आहे. शाळांमधील कला व क्रीडाचे शिक्षक हद्दपार झालेले आहेत. छोट्या शाळेतील कला, क्रीडा शिक्षकांना विषय शिक्षक बनवलेलं आहे. कुठून येणार गुणवत्ता ?  

अशा विपरीत परिस्थितीमध्ये सर्वात मोठा कहर केला आहे तो निवडणूक आयोगाने. राज्यभरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक हे निवडणूक आयोगाच्या हुकुमशाहीला कंटाळले आहेत. निवडणूक आयोगाला शिक्षक हे आपलेच परमनंट कर्मचारी आहेत व ते आता डेप्युटेशनवर शाळेत शिकवायला गेल्याचा भास होत आहे. बीएलओ ड्यूटीसाठी तहसीलदार वा निवडणूक अधिकारी शिक्षकांवर, मुख्याध्यापकांवर दबाव टाकत आहेत. शाळा सोडून बीएलओ ड्युटी करण्यास नकार देणा-या शिक्षकांना निवडणूक आयोगाने लेखी नोटीसी पाठवल्या आहे. जर आपण बीएलओची डय़ुटी स्वीकारली नाही तर आपल्यावर गुन्हा दाखल करु, आपणाला तुरुंगात टाकू अशा धमक्याही दिल्या जात आहे. शाळा चालू ठेवा अथवा बंद ठेवा परंतु बीएलओची ड्युटी करावीचं लागणार असं त्यांच म्हणणं आहे.  बीएलओ ड्युटीसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रांमध्ये किमान ४० ते ५० शिक्षकांना तहसीलदाराने अधिग्रहित केलेले आहे. २८८ इतक्या विधानसभांचा विचार केला असता किमान बारा ते पंधरा हजार शिक्षक हे शाळा सोडून निवडणूक आयोगाचे कर्मचारी झालेले आहेत. बीएलओ अथवा तत्सम निवडणुकीचे कामे बारा विविध विभागातील कर्मचाऱ्यांना द्यावीत असं परिपत्रकात नमुद आहे. अशी स्पष्ट तरतूद असताना नव्वद टक्के बीएलओची कामे शिक्षकांना का दिली जातात? निवडणुकीच्या नावाखाली तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक आपल्यावरील जबाबदाऱ्या शिक्षकांना लादत आहेत. आपल्याजवळ असणाऱ्या अधिकारांचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर चाललेला आहे. आम्हाला दिलेली कामं मुदतीत संपवायचे आहे. तुम्ही शाळा चालू ठेवा अथवा बंद करा. अशी उर्मट भाषा निवडणूक अधिकारी वापरत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षक जर शाळेबाहेर राहणार असतील तर या शिक्षकांच्या वर्गात विद्यार्थ्यांना कोण शिकवणार? पोलिसांनी शाळेतील शिक्षकांना निवडणूक कामावर हजर राहण्यास प्रव्रृत्त करावे अथवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार निवडणूक आधिका-यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या आहेत. शिक्षक हे जर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपलब्ध होणार नसतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षण काय होणार? सरकारी शाळांतील गुणवत्ता तपासायला प्रथम सारख्या संस्था  आहेतच. शिक्षकांची आजची अवस्था आई जेऊ घालीना व बाप भिक मागू देईना अशी झालेली आहे.  

निवडणूक अधिकारी हे हुकूमशाह झालेले आहेत. निवडणूकीच्या कामाला दिलेला नकार हा त्यांना राष्ट्रदोह वाटत आहे. शिक्षकांनी दाद कोणाकडे मागावी? हाच प्रश्न उरला आहे.  शिक्षक व  संघटना कोर्टात गेलेल्या आहेत. कोर्टाने सुद्धा बीएलओ कामासाठी शिक्षकांवर सक्ती करता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. कोर्टाने दिलेला निर्णय सार्वत्रिक स्वरूपात मानण्यास निवडणूक अधिकारी तयार नाहीत. जो व्यक्ती कोर्टात गेला त्यालाच केवळ निवडणूक ड्युटीतून वगळले जात आहे. राज्याच्या शिक्षण विभागाला व ग्रामविकास विभागाला याचं काहीच पडलेलं नाही. आपण नियुक्त केलेले शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत की नाही याची पडताळणी करायलाही त्यांच्यापाशी वेळ नाही. मागे शिक्षक संघटनांनी खूप गदारोळ केल्यानंतर शिक्षण सचिवांनी "शिक्षकांना बीएलओ ड्युटीसाठी अधिग्रहित करू नका" असं पत्र निवडणूक आयोगाला दिले होते.  निवडणूक आयोग शिक्षण विभागाचं ऐकायला तयार नाही. शिक्षक प्रामाणिकपणे, अचुक, विश्वासार्ह कामे करतात म्हणून त्यांनाच कामे लावणार का? विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याची भूमिका निवडणूक आयोग कसा काय घेऊ शकतो. आरटीई कायद्यात शिक्षकांना जनगणना अथवा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसांव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असी स्पष्ट तरतुद आहे. ती कामे करणे कायद्यानुसार शिक्षकांना बंधनकारक नाहीत. परंतु आता कायद्याचं राज्य राहिलं आहे का? कायदा सर्रास पायदळी तुडवला जात आहे . कायद्यापेक्षा निवडणूक आयोग स्वत:ला मोठा समजत आहे. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायला मुख्याध्यापक गेला तर त्या मुख्याध्यापकालाच बिलओ ड्युटीसाठी अधिग्रहीत करण्याचं पत्र काही अधिकारी पाठवत आहेत. काही निवडणूक अधिकाऱ्यांनी तर वेगळीच शक्कल लढविली आहे. शिक्षकांनी सुट्टीच्या दिवसांमध्ये बीएलओची कामे करावीत. काही ठिकाणी शिक्षकांनी शाळा भरण्याच्या अगोदर व शाळा सुटल्यानंतर बिएलओची कामे करावीत असेही आदेश दिलेले आहेत. आम्ही शिक्षक आहोत कि घाण्याचे बैल हेच कळायला मार्ग नाही. 

दोन वर्षापूर्वी शिक्षकांनी #आम्हाला शिकवू द्या, हा हॅशटॅग वापरात राज्यभर आंदोलन केले होते. राज्यातील लाखो शिक्षकांची केवळ एकच मागणी होती की आम्हाला मुलांजवळ राहू द्या व मुलांना शिकवू द्या. या आंदोलनाचा परिणाम म्हणून थोड्या बहुत प्रमाणात अशैक्षणिक कामे कमी झाली होती . पुन्हा या अशैक्षणिक कामांनी जोर धरलेला आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अगोदरच कमी केलेली आहे.  बीएलओची ड्युटी या केवळ सरकारी व अनुदानित शाळेतील शिक्षकांना दिल्या जात आहेत. विनानुदानित इंग्रजी, कायम विनानुदानीत इंग्रजी  अथवा आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळेतील कोणत्याही शिक्षकाला निवडणुकीच्या ड्युटीज का दिल्या जात नाहीत? शैक्षणिक नुकसान केवळ सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचेच करायचे का? सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची  केवळ गुणवत्ता तपासायची. विनाअनुदानित, कायम विनानुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता तपासायला कोणी जात नाही. त्यांच्यावर कोणत्याचं प्रकारची अशैक्षणिक कामे लादली जात नाहीत. हा भेदभाव बंद व्हायला हवा.  

आज अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांची संख्या कमी असतानाही निवडणूक आयोग शिक्षकांना धमक्या देऊन बीएलओची कामे करायला लावत आहेत. ग्रामविकास मंत्री व शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून शिक्षकांना केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मोकळं करायला हवं. शिक्षणाच्या मानगुटीवर बसलेलं बीएलओ भूत खाली उतरवायला हवं. पुरेसे शिक्षक व भौतिक सुविधाही उपलब्ध करून द्यायला हव्यात. बदल्यांचा व नवीन संचमान्यतेचा जीआर त्वरित रद्द करावा लागेल. अस्थिर वातावरणात शिक्षण विकास होत नसतो. शिक्षकांमध्ये स्थैर्याचं वातावरण असायला हवं तरच ते पूर्ण क्षमतेने  विद्यार्थ्यांना शिकवू शकतील. शिक्षण हे विद्यार्थी व शिक्षक या दोघांसाठीही आनंददायी असायला हवं. शिक्षक व विद्यार्थी हे दोघेही आनंदी असतील तरच खरी शिक्षण प्रक्रिया होईल. मला खात्री आहे नव्याने आलेलं सरकार या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करेल. अशैक्षणिक कामांच ओझं शिक्षकांवर लादणार नाहीत.  निवडणूक आयोगाच्या कचाट्यातून राज्यातील शिक्षण वाचवतील. 

जालिंदर देवराम सरोदे, 
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य

Monday 13 January 2020

मुंबईतील खाजगी प्राथमिक शाळेतील मुलं सावत्र आईची आहेत का ?

मुंबई महानगरपालिकेचा बजेट हे भारतातील छोटय़ा राज्यांपेक्षा जास्त आहे. अगदी गोवा किंवा दिल्ली या राज्याचे बजेटही मुंबई महानगरपालिकेपेक्षा कमी आहे. आज घडीला मुंबई महानगरपालिकेच्या किमान साठ हजार कोटींच्या ठेवी आहेत. इतका अवाढव्य व्याप असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचं शिक्षणासाठी बजेट आठशे कोटी आहे. शिक्षणासाठी एवढं मोठं बजेट असूनही मुंबई महानगरपालिका अखत्यारीतील शाळांची स्थिती काय आहे याचा आढावा घेतल्यास विदारक स्थिती आपल्या लक्षात येईल. 

आज मुंबई महानगर पालिकेवर मराठीचे नावाने राजकारण करणारा पक्ष सत्तेत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील खाजगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळांची स्थिती पाहिली असता अत्यंत भयावह अशी आहे. 

सर्वात प्रथम माहिती घेऊया विनाअनुदानित शाळांची. जवळपास २००० पासून मुंबईतील खासगी प्राथमिक विनानुदानीत १०४ शाळा महानगरपालिकेकडे अनुदान मागत आहे. खाजगी संस्थांनी या शाळा राज्य सरकार व बीएमसीच्या मान्यता घेऊनच चालू केलेल्या आहेत. एकाच वेळी खाजगी प्राथमिक सोबत चालू झालेल्या माध्यमिक शाळांना कधीच अनुदान मिळालेले आहे. एकाच इमारतीत भरणाऱ्या या खाजगी प्राथमिक शाळा विनानुदानित आहेत तर माध्यमिक शाळा या अनुदानित झालेल्या आहेत. खाजगी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फी भरावी लागत आहे तर माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना अनुदान मिळत असल्यामुळे शिक्षण हे मोफत आहे. गेली वीस वर्षे विद्यार्थी व शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. एवढं प्रचंड बजेट असलेली महानगरपालिका शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अनुदान द्यायला तयार नाही. यातील बहुसंख्य शाळा या नगरसेवक, आमदार यांनी सुरू केलेले आहे. जवळपास निम्म्या शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. बीएमसी या शाळेतील मुलांना व शिक्षकांना न्याय द्यायला तयार नाही. बीएमसीतील अधिकारी व सत्ताधारी यांना केवळ खरेदी विक्रीच्या वस्तूंमध्ये रस आहे. बीएमसीच्या इमारतीच्या डागडुजीवर करोडो रुपये उधळले जातात. 

बीएमसीच्या विद्यार्थ्यांना सत्तावीस वस्तू मोफत देण्याच्या नावावर भांडणे सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे द्यायला प्रशासन तयार नाही. वस्तू आम्ही खरेदी करू व वितरित करू असा पवित्रा महानगरपालिकेने घेतलेला आहे. या एकशे चार शाळेत शिकणारे विद्यार्थी फी देऊन शिकत आहेत. शिक्षक गेली वीस वर्ष हजार- दीड हजार पगारावर काम करत आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये हजार- दीड हजार पगारावर त्यांच्या घराचे लाईट बिलंही भागत नसेल. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईसारख्या शहरात शिक्षकांच इतकं शोषण मानवतेला व लोकशाहीला काळीमा फासणारं आहे. आरटीई कायद्यानुसार वयाच्या चौदाव्या वर्षांपर्यंत मुलांना मोफत व सक्तीचा शिक्षण देणं गरजेचं आहे. परंतु कुंपणच जर शेत खात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे ? बीएमसी या विद्यार्थ्यांवर एक रुपयाही खर्च करायला तयार नाही. या विद्यार्थ्यांना एकही वस्तू बीएमसी देत नाही. या खाजगी अनुदानित शाळांवर सर्व कायदे बीएमसीचे लागू होतात. राज्य सरकारचे सर्व परिपत्रके हे बीएमसी  वगळून असतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीचे निर्देशांक दाखवण्यासाठी खाजगी शाळेतील मुलांची आकडेवारी बीएमसी दाखवते. परंतु या मुलांची व शिक्षकांची आर्थिक जबाबदारी स्वीकारायला नकार देते. हे बेकायदेशीर आहे. बीएमसीला केवळ खरेदी विक्रीच्या वस्तूंमध्ये रस आहे का? 

गेली वीस वर्षे अनुदान मागणाऱ्या या शाळांवर वार्षिक किती खर्च होणार आहे याची माहिती घेतली असता चाळीस ते पंचेचाळीस कोटींमध्ये या सर्व शाळांना पूर्ण अनुदान दिलं जाऊ शकतं. यातील निम्मी रक्कम राज्य सरकार देय आहे.  बीएमसी राज्य सरकरचे नाव पुढे करत एवढी छोटी रक्कमही द्यायला तयार नाही. बीएमसीच्या कारभाऱ्यांना इमारत दुरुस्तीमध्ये, सत्तावीस वस्तूंच्या खरेदीमध्ये रस आहे.  विद्यार्थी व शिक्षकांना अनुदान देण्यात कोणताही रस नाही. कारण यातून सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला कोणतेही प्रकारचं कमिशन मिळणार नाही. अशा प्रकारचं वर्तन बीएमसीला भूषणावह नाही. या सर्व शाळांना व शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने ताबडतोब अनुदान द्यायला हवं. आरटीई कायद्यानुसार मुलांना मोफत व सक्तिचं शिक्षण देणं हे बीएमसीचं आद्यकर्तव्य आहे. यात बीएमसीने राज्य सरकारकडे बोट दाखवून उपयोग नाही. जिथे गुणवत्ता आहे, जिथे मुलं आहेत तेथील शिक्षणावर बीएमसी खर्च करायला तयार नाही. 

या संदर्भामध्ये आम्ही आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली माननीय आयुक्तांची भेट घेतली असता आयुक्तांनी अतिशय भयावह असा प्रस्ताव ठेवला. आम्ही प्रती विद्यार्थ्यी अनुदान द्यायला तयार आहोत. म्हणजे व्हाऊचर सिस्टीम लावण्याच्या तयारीत प्रशासन आहे. याला आमदार कपिल पाटील यांनी कडाडून विरोध केला. व्हावचर सिस्टीमचे पाकिस्तान आणि चिलीमध्ये झालेले प्रयोग फसलेले आहेत. व्हावचर सिस्टीममुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होईल. अशी कोणतीही योजना लागू करायला आम्ही कडाडून विरोध करू. आपण विनाअट खाजगी विनानुदानित शाळांना अनुदान सुरू करायला हवं. असं आमदारांनी ठणकावलं. आयुक्त ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आता बीएमसीमध्ये सत्तेवर असणारेच राज्यात सत्तेवर आलेले आहेत. कदाचित आता बदलाची अपेक्षा आहे. 

विनानुदानित पेक्षा वेगळी स्थिती अनुदानीत शाळांची नाही. खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांनाही बीएमसी कोणत्याही प्रकारची मदत करायला तयार नाही.  राज्यशासन शालेय पुस्तकं व शालेय पोषण आहार देतं या दोनच गोष्टी खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळतात. या सर्व शाळा शासन मान्यता पात्र आहेत व बीएमसीची जबाबदारी आहे. बीएमसीच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारे सर्व फायदे हे खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळायला हवेत. खाजगी अनुदानित शाळांना गेली कित्येक वर्षे वेतनेतर अनुदान मिळालेले नाही. या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्यापही प्रतिमाह पंधरा ते वीस रुपये सरकारी फी भरावी लागते. देशभरात आरटीई कायदा लागू झालेला आहे. सक्तीचे व मोफत शिक्षण देणं ही राज्य सरकार व बीएमसीची घटनात्मक जबाबदारी आहे. या शाळा चालणार कशा? विद्यार्थ्यांची जमा होणारी तुटपुंज्या फीतून शाळेचे एका महिन्याचं विज बिलही भरू शकत नाही. कशा टिकणार मुंबईमध्ये अनुदानीत शाळा. बीएमसी आपल्या अखत्यारीतील खाजगी अनुदानीत शाळांना अशी सापत्नपणाची वागणूक देऊ शकत नाही.  एखाद्या गंभीर आजाराने शिक्षक रजेवर गेला तर शिक्षणाधिकारी कार्यालय त्या बदल्यात शिक्षक उपलब्ध करून देत नाहीत. एखादा शिक्षक अतिरिक्त ठरला त्याची सर्व्हिस ब्रेक केली जाते. वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाली तरच पेन्शन मिळते. व्हीआरएस घेणा-या शिक्षकांना पेन्शन मिळत नाही. शिक्षक सेवानिवृत्त होऊन दोन-दोन, चार-चार वर्षे झाली तरी त्यांना पेन्शन मिळत नाही. बीएमसी शिक्षकांप्रमाणे  खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बोनसही मिळत नाही.  प्रत्येक तीन वर्षांनी बीएमसी कडून शाळांना मान्यता घ्यावी लागते. त्यासाठीही शिक्षणाधिकारी कार्यालय प्रचंड त्रास देते. बीएमसीच्या शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळाला परंतु अद्यापही  खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळालेला नाही. खाजगी शाळेतील शिक्षकांना मेडिकल रिअम्बर्समेंट बीएमसी देत नाही. बीएमसी शाळेतील शिक्षक व खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक यांच्या वेतनामध्ये प्रचंड तफावत आहे. बीएमसी शाळेतील शिक्षकांना दिली जाणारी ग्रॅच्युएटी व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मिळणारी ग्रॅच्युएटी यांमध्येही जमीन अस्मानाचा फरक आहे.  

खाजगी प्राथमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिकणा-या मुलांचे पालक मुंबईत राहात नाहीत का? या मुलांचे पालक बीएमसीला कर देत नाहीत का? खाजगी अनुदानित व विनानुदानित शाळेत शिकणारी मुलं ही बीएमसीची जबाबदारी नाही का? आरटीई कायद्यानुसार मुंबई अखत्यारीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण देणं ही बीएमसीची जबाबदारी आहे. बीएमसी ती जबाबदारी पार पाडणार किंवा नाही हाच खरा प्रश्न? खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिकणारी मुले ही सावत्र आईची आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

नागपूर अधिवेशनात आम्ही आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना त्वरित अनुदान द्यावे. अनुदानित-विनानुदानीत शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना बीएमसी शिक्षकांप्रमाणे व विद्यार्थ्यांप्रमाणेच सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी केली. या प्राथमिक शाळांसाठी आमची लढाई तर चालूच आहे. राज्यात व बीएमसीमध्ये एकाच पक्षाचे सरकार आहे. आता बीएमसी अखत्यारितील सर्व शिक्षकांनी एक होऊन शेवटचा व निकराचा लढा द्यायला तयार व्हायला हवे. यात संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी सर्वांनीच रस्त्यावर उतरायला हवे. राज्य सरकारची इच्छा झाली तर शिक्षण क्षेत्रात फार आमूलाग्र असे बदल घडू शकतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील शिक्षणाची दशा आणि दिशा बदलली. त्यांनी शिक्षणावर सत्तावीस टक्के इतका अवाढव्य खर्च केला. बीएमसी मात्र तीन ते चार टक्क्यांच्यावर शिक्षणावर खर्च करत नाही हे अत्यंत गंभीर आहे. बीएमसी जर शिक्षणावर खर्च करत नसेल तर आपणाला रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल. सर्वांना एक व्हावं लागेल. ही एकजूट जर सर्वांनी दाखवली तर येणाऱ्या वर्षभरात न्याय हक्काचा हा लढा नक्कीच जिंकता येईल. 

जालिंदर देवराम सरोदे 
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष - मुंबई ग्रॅजुएट फोरम