Saturday 30 September 2017

लढूया, जिंकूया!



शिक्षक बंधू-भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
सर्व प्रथम एलफिस्टन रोड येथील दुर्घटनेत जीव गमावलेल्या कुटुंबियांच्या प्रति सहवेदना आणि जे जखमी आहेत त्या सर्वांसाठी प्रार्थना. 

तुम्हा सर्वांना अशोक विजयादशमी दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा...!

लोकसत्ता दैनिकाच्या शुक्रवार दि. २९ सप्टेंबर २०१७ रोजीच्या अंकात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. 'डॉ. दीपक सावंत, कपिल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला' या बातमीतील काही मजकूर पुढीलप्रमाणे - 

''मुंबई शिक्षक हा मतदारसंघ पारंपारिकदृष्टय़ा भाजपशी संबंधित संघटनेचा बालेकिल्ला होता. संजीवनीताई रायकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विजय मिळविला. सध्या कपिल पाटील आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. शिक्षकांचे वेतन मुंबै बँकेत जमा करण्यावरून कपिल पाटील यांनी भाजप व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी दोन हात केले आहेत. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत कपिल पाटील यांना पराभूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.''
http://www.loksatta.com/mumbai-news/deepak-sawant-vs-kapil-patil-teachers-constituency-election-1560892/

वाचा. विचार करा. 

नवीन सरकार आपल्यापासून आपल्या सर्वांची अवस्थाही एलफिस्टन रोड येथील चेंगराचेंगरी सारखीच झालेली आहे. संचमान्यता, कला-क्रीडा शिक्षकांवरील आघात, २००५ नंतरच्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश, २०१२ नंतरच्या शिक्षकांवर चौकशीची टांगती तलवार, ऑनलाईन कामाचा बोझा, पेन्शन, प्लॅन-नॉन प्लॅन, विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न, रात्रशाळावर सूडबुद्धीने केलेली कारवाई आणि आता त्यांनी आपल्या पगारावर हल्ला केला आहे. गेली काही महिने आपण त्याविरोधात लढतो आहोत. 

धनसत्ता आणि राजसत्ते विरोधातील आपली ही अटीतटीची लढाई आपण मोठ्या धैर्याने आणि निकराने लढतो आहोत. ते केवळ तुम्हा सर्वांच्या पाठिंबा व एकीमुळेच, आपले आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शन आहेच. धनसत्ता आणि राजसत्तेसमोर आपण नमायला तयार नाही हे लक्षात आल्यावर विविध मार्गांनी आपली लढाई, एकी यांना सुरुंग लावायचं काम सुरु आहे. सरकारी पक्षातर्फे कोर्टात या ना त्या कारणाने तारीख पे तारीख चा खेळ सुरु आहे. पगार उशीर होण्यासाठी नाना शक्कली लढवल्या जात आहेत. वरपासून खालपर्यँत सर्व यंत्रणा कोर्टाचे आदेश पायदळी तुडवत आपल्याला त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम राबवत आहे. काहींना प्रलोभने  देऊन आपल्याविरोधात लढण्यासाठी पुढे करण्यात येत आहे. अपप्रचार करण्यात येत आहे. काळ कठीण आहे, पण म्हणून घाबरायचं कारण नाही. 

विधान परिषदेतील आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. भाजपचा हा डाव आपण सर्वांनी ओळखायला हवा. 

'जब शासक का बुरा वक्त आता है तब वो शिक्षकों पर अत्याचार करता है!' असं आर्य चाणक्य म्हणाला होता. मला खात्री आहे मदांध नंद राजाची सत्ता आपण सर्वजण मिळून उलटवून लावू. सरकारच्या छळातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर कपिल पाटील सरांचे हात अजून बळकट करूया. सरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया. भाजपच्या जाळ्यात न फसता शिक्षण हक्काची आणि शिक्षक सन्मानाची आपली लढाई मजबूत करूया. लढूया, जिंकूया!


आपला, 
जालिंदर देवराम सरोदे 
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती  
sarodejalindar1@gmail.com

Wednesday 27 September 2017

बेसलेस बेसलाईन - सेन्सलेस सरकार


बेसलाईन परीक्षेवर महाराष्ट्रभर गोंधळ चालू आहे. सर्व राज्यभर या परीक्षा घेण्यात येत आहेत आणि राज्यभरातील विद्यार्थी, पालक व शिक्षक प्रचंड तणावात आहेत. १० वी, १२ वी च्या धर्तीवर परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. परंतु त्याची कोणतीही पूर्वतयारी नाही. एसी रुममध्ये बसणाऱ्यांच्या समाधानासाठी राज्याची यंत्रणा राबत आहे. किमान दीड कोटी विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बेसलाईन परीक्षांच्या तारखा वारंवार बदलल्यामुळे संपूर्ण यंत्रणा या परीक्षांच्या मागे असते. गणित, विज्ञान, भाषा, इंग्रजी या विषयांची ही परीक्षा आहे. 

परंतु परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कधीच शाळांना पूरेशा मिळत नाहीत. सरकारकडे यु-डायसमुळे प्रत्येक विभागवार विद्यार्थ्यांचे अद्ययावत आकडे आहेत. प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणाहून का छापल्या जातात? कोणाचा अट्टहास आहे? कशासाठी? कोणाच्या फायद्यासाठी? प्रश्नपत्रिका अपुऱ्या का? कोण कट मारतेय? कोणताही अधिकारी उत्तर द्यायला तयार नाही. कारण मोठ्या हेडमास्तरची अवकृपा कोण घेणार? दबक्या आवाजात कटची चर्चा चालू आहे. प्रत्येक जिल्ह्याला का नाही छापत प्रश्नपत्रिका? किती प्रवासखर्च वाचला असता?

आज राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. कोण शिकवत असेल त्या मुलांना? २०१२ नंतर मान्यता मिळालेल्या ७००० गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना सरकारने घरी पाठवले. काय झाले असेल ते शिकवत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे? रात्रशाळेच्या दुबार नोकरीतील १०५० शिक्षकांना घरी पाठवले. विज्ञान, गणित व इंग्रजी विषय शिकवण्यासाठी सरप्लस म्हणून डीएड मराठीचे शिक्षक पाठविले. काय लिहिणार मुलं पेपर? ही सगळी बनवाबनवी चालू आहे. 

शाळेत शिक्षक घेत असलेल्या परीक्षांवर सरकारचा विश्वास नाही काय? शाळेत प्रत्येक युनिटवर युनिट टेस्ट होत असते, असे असताना बेसलाईन चाचण्यांचे प्रयोजन असण्याचे कारण काय? शिक्षकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. शिक्षक प्रश्नपत्रिका काढू शकत नाहीत का? शाळेचा अभ्यासक्रम शिकवायचा सोडून सर्व यंत्रणा बेसलाईनच्या मागे पळत आहे. शाळेचे वार्षिक नियोजन कोसळले आहे. तारखांतील बदलामुळे शाळांना सहशालेय उपक्रम बदलावे लागलेत. त्याच दिवशी पेपर तपासण्याचे फर्मान काढले. कसे शक्य आहे? 

या चाचण्यांमुळे सातवीच्या एका मुलाने आत्महत्या केली. कोवळ्या वयातच आपण मुलांवर व पालकांवर तणाव निर्माण करत आहोत. कोण आहे या आत्महत्येला जबाबदार? काय करणार ही माहिती जमवून? प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा प्रगतीचा आकडा दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठीचा हा अट्टहास आहे का? 

या बेसलाईनच्या प्रश्नपत्रिका झेरॉक्स मशीनवर ५० रुपयाला विकल्या जातात. शाळेत प्रश्नपत्रिका पोहोचण्याआधी त्या झेरॉक्स मशीनवर कशा पोहोचतात? त्यातून मिळालेल्या गुणांची आकडेवारी जर महाराष्ट्राच्या प्रगतीचे मूल्यमापन करून पाठ थोपटून घ्यायची असेल तर जरूर घ्यावी. पण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की, 'मुलांना शिकवायला शिक्षक नाही देणार पण परीक्षा मात्र घेणार.' 

बेसलाईनच्या प्रश्नपत्रिकेबाबत अनेक शंका आहेत. २ री ते ९ वी च्या मुलांना या परीक्षा द्याव्या लागत आहेत. वर्षभरात तीन परीक्षा द्यायच्या आहेत. शाळेच्या चार परीक्षा धरुन एकूण सात परीक्षा विद्यार्थ्यांनी द्यायच्या आहेत. आता शिक्षकांनी शिकवायचे सोडून पेपर काढणे, पेपर तपासणे, निकाल तयार करणे व त्यांचं ऑनलाईन फीडींग करणे एवढेच काम वर्षभर करायचे आहे. दाद मागायची कोणाकडे? बेसलेस बेसलाईन आणि सेन्सलेस सरकार महाराष्ट्रातील शिक्षणाला कोणी वाली राहिलेला नाही. शिक्षकांना प्रचंड अपमानीत केले जात आहे. या सर्व परीक्षा शिक्षकांवर अविश्वास दाखवणाऱ्या आहेत. यातून शिक्षक हा अपमानित होतोय, निराश होतोय. त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतलंय. त्याला ‘सरल’मध्ये गुंतवलंय. सेल्फी काढायला लावली, त्याला ट्विटरवर अकाऊंट उघडायला लावताय. यात महाराष्ट्राची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा हरवत चालली आहे. 

शिक्षकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे. राज्यभरातील शिक्षक आम्हाला मुलांना शिकवू द्या (#तावडेसाहेबआम्हालाशिकवूद्या), अशी आर्त हाक शासनाला देत आहेत. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. शिक्षक, टेक्नोसेव्ही झाल्याचा गैरफायदा सरकार उचलत आहे. शिक्षकांचे स्मार्टफोन व नेट सरकारला आपली मालमत्ता वाटत आहे. वरिष्ठ अधिकारी रात्री, अपरात्री मेसेज टाकून शाळा भरण्यापूर्वी माहिती सादर करण्याचे आदेश देत आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक प्रचंड तणावाखाली आहेत. अद्यापही बेसलाईन टेस्टचे मार्क्स् ऑनलाइन फीड झालेले नाहीत. तोपर्यंत शाळांची प्रथम सत्र परीक्षा सुरु होत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासन पुन्हा समेटिव्ह परीक्षा घेणार आहे. मुलांची संपूर्ण सुट्टी अभ्यासासाठी वापरावी असे आदेश सरकारने दिले आहेत. मुलांना दिवाळीची सुट्टी किंवा उन्हाळ्याची सुट्टी ही विश्रांती घेण्यासाठी असते. मुलांनी खेळावं, बागडावं. फ्रेश होऊन पुन्हा शाळेत यावं यासाठी शिक्षणतज्ज्ञांनी या सुट्टीची कल्पना मांडली होती. परंतू शासन आज सर्व बालमानसशास्त्रीय संकेत पायदळी तुडवत आहे. यामुळे संपूर्ण यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहे. 

बेसलाईन परीक्षा या अशैक्षणिक, अतार्किक, विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण निर्माण करणाऱ्या बालमानसशास्त्र विरोधी आहेत. विद्यार्थ्यांना वाईट सवयी लावणाऱ्या, शिक्षकांवर अविश्वास निर्माण करणाऱ्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन कामे व बेसलाईन परीक्षा या त्वरीत बंद केल्या पाहिजेत. 

प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र
sarodejalindar1@gmail.com

Saturday 23 September 2017

मुलांसाठी शाळा सुरक्षित बनवूया


मी स्वतः क्लास टीचर आहे. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत मी वर्गातल्या मुलांना जितका वेळ देऊ शकत होतो, आज तितका वेळ देता येत नाही. त्याला कारण आहे, सरकारचं ऑनलाइन धोरण. शिक्षकाला रोजची हजेरी ऑनलाइन फीड करावी लागते. परीक्षेचे पेपर तपासून गुण फीड करावे लागतात. सरलवर माहिती भरावी लागते. या सर्व तांत्रिक गोष्टी करताना मुलांशी भावनिक विश्वासाचं नातं निर्माण करायचं राहून जातं. मुलांच्या तक्रारींसाठी वेळ देता येत नाही. आपल्या वर्गातली मुलं शाळेच्या गेटपर्यंत गेलीत का, हे रोज पाहणं आता वेळेअभावी शक्य होत नाही. पूर्वी मी आठवड्यातून एक पिरियड मुलांना बोलण्यासाठी द्यायचो. आता शिकवण्यापेक्षा वेगळ्या कामात सरकारने गुंतवल्यामुळे मुलांशी मनमोकळा संवाद साधण्यासाठी वेळ काढता येत नाही. 

अनुदानित शाळांमधील शिक्षकांची संख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे  फ्री तासिका इतर कामात घालवाव्या लागतात. शिक्षक व मुख्याध्यापक सरकारी आदेशांमुळे प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. शिक्षकेतर कर्मचारी, विशेषतः शिपाई व लिपिक यांची गेली दहा वर्षे भरती झालेली नाही. दोन हजार मुलांसाठी तीन ते चार शिपाईच आहेत. त्यामुळे त्या शिपायांना मुख्याध्यापक, लिपिक यांचीच कामे करण्यापासून वेळ मिळत नाही. क्रीडांगणावर किंवा शाळेच्या इतर परिसरात लक्ष ठेवण्यासाठी कोणताही कर्मचारी उपलब्ध नसतो. शाळेला अधिकृत सुरक्षा रक्षक सरकार देत नाही. शाळेत कुणीही बिनदिक्कत प्रवेश करू शकतो. सरकारनेच शाळांना कंपाऊंड वॉल बांधून द्यायला हवी. सुरक्षा रक्षक द्यायला हवा. पुरेसे शिक्षकेतर कर्मचारी द्यायला हवेत. सरकार अनुदानित शाळांना वेतनेतर अनुदान देत नाही. दिले तरी त्यातून शाळेचं वीज बिलही भागत नाही. सरकार या जबाबदाऱ्या घेत नाही. उलट, त्या जबाबदाऱ्या शाळांवर टाकते. अनुदानित शाळांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झालेत. काही शाळांनी सीसीटीव्ही बसवलेत. सीसीटीव्हीचं महिन्याला पंचवीस हजारांपासून सव्वा लाखापर्यंतचं बिल येत आहे. आणि सरकार आता शाळांचं वीज बिल कमर्शियल म्हणून आकारत आहे. 

सरकार जोवर शाळांच्या या मूलभूत गरजांकडे लक्ष घालत नाही, तोवर विद्यार्थी सुरक्षित राहणार नाहीत. 

पूर्व प्रसिद्धी - साप्ताहिक चित्रलेखा, २२ सप्टेंबर २०१७

जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र

Wednesday 13 September 2017

लढाई शिक्षकच जिंकणार आहेत

जुल्मी जब जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से ..!
चप्पा चप्पा गुंज उठेगा इंकलाब के नारों से..!!


महाराष्ट्र राज्याचे शिक्षण खाते हे शिक्षक, विद्यार्थी पालक यांचे शोषण दमन करत आहे. शिक्षणमंत्री शिक्षण सचिवांनी गोरगरिबांचे शिक्षण उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे. अनुदानीत शिक्षण संपवणे, हा सरकारचा अजेंडा आता समोर आला आहे

राज्य सरकार अनुदानित शिक्षण संपवण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहे. सातवा वेतन आयोग लागण्याच्या अगोदर शिक्षकांची संख्या कमी करण्यासाठी २८ ऑगस्ट २०१५ च्या जीआर नुसार संचमान्यता केली. रात्रशाळेच्या शिक्षकांना सेवेतून कमी केले. कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्या बंद केल्या. २०१२ नंतरच्या शिक्षकांच्या सेवा समाप्त केल्या. २००५ नंतरच्या शिक्षकांच्या चौकशा सुरु आहेत. विनाअनुदानित शिक्षकांना अजूनही अनुदान मिळत नाही, हे कमी की काय म्हणून एमईपीएस अॅक्ट, एस.एस.कोड यातही शासन बदल करुन शिक्षकांचे संरक्षण काढून घेणार आहे. आता मुंबईतील शिक्षकांचे सुरक्षित पगार असुरक्षित केले आहेत.

सरकार म्हणजे स्वतःची जहागिरी असल्याच्या अविर्भावात शिक्षण मंत्री शिक्षण सचिव वागत आहेत. कोणतीही तक्रार नसताना आणि मुंबईतील शिक्षकांना तारखेला नियमित पगार मिळत असताना, केवळ आपल्या एका आमदाराची बँक वाचवण्यासाठी मुंबईतील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून जिल्हा मध्यवर्ती बँकेत वळविले. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत. जिल्हा बँका बुडाल्या, त्यामध्ये शिक्षकांचे पगारच नव्हे तर आयुष्यभराची रक्कम बुडाली. त्याला पर्याय म्हणून राष्ट्रीयकृत बँकांची निवड सरकारने केली ती केवळ शिक्षकांच्या सुरक्षित पगारासाठी. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आल्यामुळे तेथील शिक्षकांचे पगार आयडीबीआय बँकेत देण्याचा निर्णय घेतला गेला. ती आयडीबीआय बँक आता युनियन बँकेत सामावली जाणार आहे. त्याचवेळी मुंबईतील शिक्षकांचे तारखेला पगार देणारी युनियन बँक बदलून तिथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आणली गेली. राज्याचे धोरण प्रत्येक जिल्ह्यासाठी बदलते काय? कशासाठी हा अट्टाहास? निर्णयाच्या पहिल्या दिवसापासून मा. शिक्षणमंत्री मुंबई बँक खोटे आकडे देत आहेत. शिक्षकांच्या नावाने हजारो बोगस अकाऊंट मुंबई बँकेने उघडली आहेत. त्यात पगारही केला. हे सरळसरळ आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन आहे. सरकारी आशीर्वादाने हे सर्व चालू आहे. शिक्षण खाते हे शिक्षकांना धमक्या देत आहे. शिक्षण खात्याचा ताबा आता मुंबई बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मुंबई बँकेत खाते उघडलेल्या शिक्षकांना दोन महिने झाले पगार नाहीत. तरी सुद्धा शिक्षक मुंबई बँकेत खाते उघडायला तयार नाहीत. हजारो शिक्षक ही लढाई लढत आहेत. कोर्टाच्या आदेशाचे पालन सरकार करत नाही, वेळकाढूपणा चालला आहे. परंतु विजय सत्याचाच होणार आहे.


आमदार कपिल पाटील यांचे समवेत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर, कार्याध्यक्ष सुभाष मोरे मी स्वतः केंद्रीय शिक्षण मंत्री माननीय प्रकाश जावडेकर यांना भेटलो. त्यांनी मुंबई बँक रात्रशाळेसंदर्भात आश्चर्य व्यक्त केले. ताबडतोबीने मुख्यमंत्र्यांशी बोलतो, असे सांगितले.


 केंद्रीय अर्थमंत्री माननीय अरूण जेटली यांना आमदार कपिल पाटील दिल्लीला जाऊन भेटले. तेही मुख्यमंत्र्यांशी बोलले.


रात्रशाळा मुंबई बँकेच्या प्रश्नाबाबत आमदार कपिल पाटील यांच्या विनंतीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेत. पण मुख्यमंत्री निर्णय घ्यायला तयार नाहीत.



मुख्यमंत्री भेटण्यासही वेळ देत नव्हते. शेवटी आमदार कपिल पाटील यांच्या खरमरीत एसएमएस नंतर रात्री १२ वाजता आम्ही पुन्हा एकदा कपिल पाटील यांचेसोबत माननीय मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटायला गेलो. आम्ही मुख्यमंत्र्यांना बँकेच्या भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या उद्गाराने आम्ही आवाक् झालो. मुंबई बँक राज्य सरकारला कर्ज देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

म्हणजे त्यासाठी मुंबईतील शिक्षकांचे पगार मुंबई बँकेकडे गहाण ठेवले आहेत का? असा सवाल कपिल पाटील यांनी विचारला. शेवटी त्यांनी तोडगा काढण्याचे मान्य केले पण अद्याप तोडगा निघालेला नाही. रात्रशाळेचा मुद्दाही सुटलेला नाही. शिक्षक भारती आमदारांची लढाई सुरूच आहे.

मुख्यमंत्री निर्णय घेत नसल्यामुळे नाईलाजास्तव अशोक बेलसरे सर, सुभाष मोरे मी तिघांनी शिक्षक भारतीच्या वतीने हायकोर्टात केस दाखल केली आहे. कोर्टाने सरकारला झापले प्रत्येक जिल्ह्यासाठी तुम्ही वेगवेगळी पॉलिसी वापरता का? असा खडा सवाल केला. प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले. पण सरकार अद्यापही प्रतिज्ञापत्र सादर करत नाहीये. शिक्षक भारतीच्या वतीने सीनिअर कौन्सिलर राजीव पाटील अॅड. सचिन पुंदे, अॅड. मिलिंद सावंत केस लढवत आहेत. शशिकांत उतेकर, प्रकाश शेळके, सलीम शेख, अमोल गंगावणे, लीना कुलकर्णी, शिवाजीराव खैरमोडे, चंद्रकांत म्हात्रे, मच्छिंद्र खरात, शरद गिरमकर, चंद्रभान लांडे, संदीप पिसे, सचिन पाटील, वसंत उंबरे, संजय दुबे असे अनेक पदाधिकारी दिवसभर कोर्टात हजर राहत आहेत. बोगस अकाऊंट, नेट बँकींग नसणे, ४१२ कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः शिक्षणमंत्र्यांनी विरोधी पक्षनेता असताना केलेला असणे, मुंबईबाहेर शाखा एटीएम नसणे, टॅक्स डिडक्शनचा अधिकार नसणे असे अनेक मुद्दे पिटीशन मध्ये आहेत.

निकाल शिक्षकांच्याच बाजूने लागणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार शाळेचे कुल अकाऊंट तर युनियन बँकेतून झाले परंतू एज्युकेशन डिपार्टमेंटने आपले कुल अकाऊंट मुंबई बँकेतच ठेवले. त्यामुळे प्रथम पगार मुंबई बँकेत जातो त्यानंतर तो युनियन बँकेच्या कुल अकाऊंटमध्ये मुंबई बँक पाठवते. परंतू जाणीवपूर्वक मुंबई बँक युनियन बँकेच्या कुल अकाउंटमध्ये पगार पाठवत नाहीय. आठ, आठ दिवस पगार वापरले जाताहेत. शिक्षकांच्या कर्जाचे हप्ते चुकतील ते मुंबई बँकेत अकाऊंट उघडतील असा समज मुंबई बँकेचा आहे.

शिक्षकांना छळण्याची एकही संधी सरकार सोडत नाही. शिक्षक परिषद रोज मुंबई बँकेच्या समर्थनाचे मेसेज टाकत आहे. बँकेचे दलाल असल्यासारखे ते वागत आहेत. शेख चिल्ली सारखी अवस्था शिक्षक परिषदेच्या नेत्यांची झाली आहे. ज्या फांदीवर बसलेले आहेत तीच फांदी ते तोडत आहेत. उद्ध्वस्त शिक्षणाचे खांदेकरी ते झाले आहेत. अगदी शिक्षण मंत्र्यांचे पी. . धमक्या देत आहेत, अशा तक्रारी येत आहेत. शिक्षकांचे दमण आणि शोषण दोन्हीही गोष्टी शासन करीत आहे.

लढाई  शिक्षकच जिंकणार आहेत. आक्टोबर पर्यंतचे पगार युनियन बँकेतून होतील. कोर्टाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. पुन्हा आपल्याला आपल्या हक्काची युनियन बँकच मिळेल. भ्रष्टाचार करणारे, खोटे बोलणारे, खोट्या बातम्या देणारे, कमी व्याजदराचे आश्वासन देणाऱ्यांवर विश्वास ठेऊन चालणार नाही. कदाचित दोन महिन्यात व्याजाचे दर वाढू शकतात. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. ही सर्व आश्वासनं म्हणजे लबाडाघरचं जेवणच आहे. आपला मेहनतीचा पगार आहे, तो राष्ट्रीयकृत बँकेतच सुरक्षित राहू शकतो. आपण संघर्ष करुयात.

लढूयात, जिंकूयात.



चोर है, चोर है, मुंबई बँक चोर है 

शिक्षकांची बँक खाती का बदलत आहेत
Tap to read - https://www.youtube.com/watch?v=kfkwv2q2bDc

केंद्रीय पद्धतीतील शिक्षक भरतीत भ्रष्टाचार कशावरून होणार नाही?
Tap to read - https://www.youtube.com/watch?v=bDbnmt3M3p8&feature=youtu.be


जालिंदर देवराम सरोदे
प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र
sarodejalindar1@gmail.com