Wednesday 27 September 2017

बेसलेस बेसलाईन - सेन्सलेस सरकार


बेसलाईन परीक्षेवर महाराष्ट्रभर गोंधळ चालू आहे. सर्व राज्यभर या परीक्षा घेण्यात येत आहेत आणि राज्यभरातील विद्यार्थी, पालक व शिक्षक प्रचंड तणावात आहेत. १० वी, १२ वी च्या धर्तीवर परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. परंतु त्याची कोणतीही पूर्वतयारी नाही. एसी रुममध्ये बसणाऱ्यांच्या समाधानासाठी राज्याची यंत्रणा राबत आहे. किमान दीड कोटी विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बेसलाईन परीक्षांच्या तारखा वारंवार बदलल्यामुळे संपूर्ण यंत्रणा या परीक्षांच्या मागे असते. गणित, विज्ञान, भाषा, इंग्रजी या विषयांची ही परीक्षा आहे. 

परंतु परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कधीच शाळांना पूरेशा मिळत नाहीत. सरकारकडे यु-डायसमुळे प्रत्येक विभागवार विद्यार्थ्यांचे अद्ययावत आकडे आहेत. प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणाहून का छापल्या जातात? कोणाचा अट्टहास आहे? कशासाठी? कोणाच्या फायद्यासाठी? प्रश्नपत्रिका अपुऱ्या का? कोण कट मारतेय? कोणताही अधिकारी उत्तर द्यायला तयार नाही. कारण मोठ्या हेडमास्तरची अवकृपा कोण घेणार? दबक्या आवाजात कटची चर्चा चालू आहे. प्रत्येक जिल्ह्याला का नाही छापत प्रश्नपत्रिका? किती प्रवासखर्च वाचला असता?

आज राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. कोण शिकवत असेल त्या मुलांना? २०१२ नंतर मान्यता मिळालेल्या ७००० गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना सरकारने घरी पाठवले. काय झाले असेल ते शिकवत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे? रात्रशाळेच्या दुबार नोकरीतील १०५० शिक्षकांना घरी पाठवले. विज्ञान, गणित व इंग्रजी विषय शिकवण्यासाठी सरप्लस म्हणून डीएड मराठीचे शिक्षक पाठविले. काय लिहिणार मुलं पेपर? ही सगळी बनवाबनवी चालू आहे. 

शाळेत शिक्षक घेत असलेल्या परीक्षांवर सरकारचा विश्वास नाही काय? शाळेत प्रत्येक युनिटवर युनिट टेस्ट होत असते, असे असताना बेसलाईन चाचण्यांचे प्रयोजन असण्याचे कारण काय? शिक्षकांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा प्रयत्न आहे. शिक्षक प्रश्नपत्रिका काढू शकत नाहीत का? शाळेचा अभ्यासक्रम शिकवायचा सोडून सर्व यंत्रणा बेसलाईनच्या मागे पळत आहे. शाळेचे वार्षिक नियोजन कोसळले आहे. तारखांतील बदलामुळे शाळांना सहशालेय उपक्रम बदलावे लागलेत. त्याच दिवशी पेपर तपासण्याचे फर्मान काढले. कसे शक्य आहे? 

या चाचण्यांमुळे सातवीच्या एका मुलाने आत्महत्या केली. कोवळ्या वयातच आपण मुलांवर व पालकांवर तणाव निर्माण करत आहोत. कोण आहे या आत्महत्येला जबाबदार? काय करणार ही माहिती जमवून? प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा प्रगतीचा आकडा दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठीचा हा अट्टहास आहे का? 

या बेसलाईनच्या प्रश्नपत्रिका झेरॉक्स मशीनवर ५० रुपयाला विकल्या जातात. शाळेत प्रश्नपत्रिका पोहोचण्याआधी त्या झेरॉक्स मशीनवर कशा पोहोचतात? त्यातून मिळालेल्या गुणांची आकडेवारी जर महाराष्ट्राच्या प्रगतीचे मूल्यमापन करून पाठ थोपटून घ्यायची असेल तर जरूर घ्यावी. पण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की, 'मुलांना शिकवायला शिक्षक नाही देणार पण परीक्षा मात्र घेणार.' 

बेसलाईनच्या प्रश्नपत्रिकेबाबत अनेक शंका आहेत. २ री ते ९ वी च्या मुलांना या परीक्षा द्याव्या लागत आहेत. वर्षभरात तीन परीक्षा द्यायच्या आहेत. शाळेच्या चार परीक्षा धरुन एकूण सात परीक्षा विद्यार्थ्यांनी द्यायच्या आहेत. आता शिक्षकांनी शिकवायचे सोडून पेपर काढणे, पेपर तपासणे, निकाल तयार करणे व त्यांचं ऑनलाईन फीडींग करणे एवढेच काम वर्षभर करायचे आहे. दाद मागायची कोणाकडे? बेसलेस बेसलाईन आणि सेन्सलेस सरकार महाराष्ट्रातील शिक्षणाला कोणी वाली राहिलेला नाही. शिक्षकांना प्रचंड अपमानीत केले जात आहे. या सर्व परीक्षा शिक्षकांवर अविश्वास दाखवणाऱ्या आहेत. यातून शिक्षक हा अपमानित होतोय, निराश होतोय. त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतलंय. त्याला ‘सरल’मध्ये गुंतवलंय. सेल्फी काढायला लावली, त्याला ट्विटरवर अकाऊंट उघडायला लावताय. यात महाराष्ट्राची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा हरवत चालली आहे. 

शिक्षकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे. राज्यभरातील शिक्षक आम्हाला मुलांना शिकवू द्या (#तावडेसाहेबआम्हालाशिकवूद्या), अशी आर्त हाक शासनाला देत आहेत. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. शिक्षक, टेक्नोसेव्ही झाल्याचा गैरफायदा सरकार उचलत आहे. शिक्षकांचे स्मार्टफोन व नेट सरकारला आपली मालमत्ता वाटत आहे. वरिष्ठ अधिकारी रात्री, अपरात्री मेसेज टाकून शाळा भरण्यापूर्वी माहिती सादर करण्याचे आदेश देत आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक प्रचंड तणावाखाली आहेत. अद्यापही बेसलाईन टेस्टचे मार्क्स् ऑनलाइन फीड झालेले नाहीत. तोपर्यंत शाळांची प्रथम सत्र परीक्षा सुरु होत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शासन पुन्हा समेटिव्ह परीक्षा घेणार आहे. मुलांची संपूर्ण सुट्टी अभ्यासासाठी वापरावी असे आदेश सरकारने दिले आहेत. मुलांना दिवाळीची सुट्टी किंवा उन्हाळ्याची सुट्टी ही विश्रांती घेण्यासाठी असते. मुलांनी खेळावं, बागडावं. फ्रेश होऊन पुन्हा शाळेत यावं यासाठी शिक्षणतज्ज्ञांनी या सुट्टीची कल्पना मांडली होती. परंतू शासन आज सर्व बालमानसशास्त्रीय संकेत पायदळी तुडवत आहे. यामुळे संपूर्ण यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहे. 

बेसलाईन परीक्षा या अशैक्षणिक, अतार्किक, विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण निर्माण करणाऱ्या बालमानसशास्त्र विरोधी आहेत. विद्यार्थ्यांना वाईट सवयी लावणाऱ्या, शिक्षकांवर अविश्वास निर्माण करणाऱ्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन कामे व बेसलाईन परीक्षा या त्वरीत बंद केल्या पाहिजेत. 

प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र
sarodejalindar1@gmail.com

6 comments:

  1. सामान्य शाळेत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग मुलांचे काय त्यांची बेस लाईन काय?
    दिव्यांग मुलांची तुलना सामान्य मुलांसोबत करणे योग्य आहे का ? हा ही मुद्दा महत्वाचा आहे.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर सर. शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी सदैव अग्रेसर शिक्षक भारती.

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर सर. शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी सदैव अग्रेसर शिक्षक भारती.

    ReplyDelete
  4. Sir agdi barobar amachyahi shaishnik bhawna yat guntlelya ahe.mi hi ek shikshak bharti sainik ahe - Mr.Harihar Sudhkar Dhawad (H.M.)Dhotiwada vid.Dhotiwada Th.Katol Dist.Nagpur

    ReplyDelete
  5. शिक्षकावर अविश्वास ठेवणारे हे सरकार बदलले पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. 1o vi 12 vi padavila 35% ne pass va 2 ri te 9 vi 60% ne pass va re va pragat maharastra

      Delete